छत्रपती संभाजीनगर : एसटी बस प्रवासादरम्यान एका ७५ वर्षीय वृद्धाला बाजूला बसलेल्या भामट्याने गुंगीकारक औषध मिसळलेले बिस्किट खाऊ घालून बेशुद्ध करत, त्यांच्या हातातील तब्बल ३ तोळे वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या लुटून भामटा पसार झाला. ही घटना २३ एप्रिल २०२६ रोजी घडली होती. विषारी औषधामुळे मेंदूवर गंभीर परिणाम झाल्याने तब्बल ६ महिने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अखेर २५ ऑक्टोबर रोजी वृद्ध शुद्धीवर आले आणि या भयानक लुटीचा उलगडा झाला. याप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो पुढील तपासासाठी क्रांती चौक पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
दादाभाऊ भाऊराव वैद्य (७५, सध्या रा. एरंडवणा, पुणे, मूळ रा. गुंडेवाडी, ता. भोकरदन, जि. जालना) असे विषबाधेतून बचावलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. फिर्यादी दादाभाऊ वैद्य हे २३ एप्रिल २०२६ रोजी मूळ गावाहून पुण्याला जाण्यासाठी जालन्यातून एसटी महामंडळाच्या बसमध्ये (क्र. एमएच-१४- एलएक्स-४३२६) बसले होते.
दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास ही बस छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती एसटी बसस्थानकात आली. त्यावेळी एक अनोळखी इसम त्यांच्या शेजारील सीटवर येऊन बसला. प्रवासादरम्यान त्याने दादाभाऊ यांच्याशी गोड बोलून गप्पा मारत जवळीक साधली. काही वेळाने त्याने स्वतःकडील बिस्किटांचा पुडा काढून त्यातील बिस्किट दादाभाऊ यांना खाण्यासाठी देऊ केले. सुरुवातीला दादाभाऊ यांनी खाण्यास नकार दिला, मात्र काही होत नाही, खाऊन घ्या, असा वारंवार अतिआग्रह केल्याने त्यांनी ते बिस्किट खाल्ले.
६ महिने रुग्णालयात उपचार; २५ ऑक्टोबरला आली शुद्ध
बस पुण्यातील वल्लभनगर एसटी बसस्थानकात (पिंपरी) पोहोचल्यानंतरही प्रवासी खाली उतरले, मात्र दादाभाऊ जागेवरून उठलेच नाहीत. सुरक्षा रक्षकांनी त्यांना बेशुद्धावस्थेत पाहून तातडीने पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले. गुंगीच्या औषधाचा तीव्र डोस असल्याने त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती आणि मेंदूवर गंभीर परिणाम झाला होता.
त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना पुण्यातील डॉ. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवले. तेथे अतिदक्षता विभागात तब्बल सहा महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर २५ ऑक्टोबर रोजी ते पूर्णपणे शुद्धीवर आले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी आपल्या हातातील सोन्याच्या अंगठ्या कुठे गेल्या, अशी विचारणा कुटुंबीयांकडे केली असता, त्यांच्यासोबत बसमध्ये झालेल्या लुटीचा प्रकार समोर आला. गुन्ह्याचा तपास क्रांती चौक ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक जाधवर करत आहेत.