

sambhajinagar Rumors of shortage cause chaos throughout the district; Long queues of vehicles in the talukas
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
सोशल मीडियावर पसरलेल्या इंधन टंचाईच्या अफवेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, गुरुवारी (दि. २६) विविध तालुक्यांतील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या अलोट गर्दीचे चित्र पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीच्या चर्चेमुळे नागरिक गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्यासाठी गर्दी करत असल्याने अनेक ठिकाणी कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने मात्र इंधनाचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट करत नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.
खुलताबाद : तासनतास प्रतीक्षा
खुलताबाद शहरासह छत्रपती संभाजीनगर रस्ता आणि खुलताबाद-फुलंब्री मार्गावरील पेट्रोल पंपांवर गुरुवारी मोठी गर्दी होती. दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना किमान एक ते दीड तास रांगेत उभे राहावे लागत आहे. काही ठिकाणी साठा संपल्याने पंप बंद करण्याची वेळ चालकांवर आली.
गंगापूरः जास्तीचे इंधन भरण्याकडे कल
गंगापूर शहरातील पाचही पेट्रोल पंप सध्या बंद अवस्थेत आहेत. बुधवारी वाहनधारकांनी नियमित १ लिटरऐवजी थेट टाकी फुल करण्याला प्राधान्य दिल्याने साठा लवकर संपला. परिस्थिती इतकी बिकट आहे की, इंधन संपल्याने अनेक चालक आपली वाहने ढकलत नेताना दिसत आहेत.
पैठणः ग्रामीण भागात साठेबाजी
पैठण शहर आणि ग्रामीण भागातील पंपांवर इंधन भरण्यासाठी मोठी झुंबड उडाली आहे. विशेषतः सोशल मीडियावरील मेसेजमुळे ग्रामीण भागातील वाहनधारक धास्तावले असून, मिळेल तिथे इंधन साठवण्याचा प्रयत्न करत आहेत.
वैजापूर, सिल्लोड : काहीसा दिलासा
वैजापूरमध्ये बुधवारी प्रचंड गर्दी होती, मात्र गुरुवारी परिस्थितीत थोडी सुधारणा पाहायला मिळाली. सिल्लोडमध्ये सकाळी गर्दी असली तरी दुपारनंतर परिस्थिती स्थिर होती. प्रशासनाने येथील नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
कन्नड : प्रशासनाचे कडक निर्बंध
कन्नड तालुक्यात अफवांचे पेव फुटल्याने मागणी आणि पुरवठ्याचा समतोल बिघडला आहे. याची दखल घेत प्रशासनाने अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत आदेश काढले आहेत. आता प्रत्येक पंपावर उपलब्ध साठा आणि मागणीचा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्याचे निर्देश नायब तहसीलदार निलेश राठोड यांनी दिले आहेत.