

Rain stops, flood situation continues at Marathwada
सुनील कच्छवे
छत्रपती संभाजीनगर: पावसाने रविवारी (दि.२८) रात्रीपासून विश्रांती घेतल्याने मराठवाड्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र बहुतेक धरणांमधून अजूनही नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने शेकडो गावांना पुराने वेढलेले आहे. परिणामी पूरस्थिती कायम आहे. दोन दिवसांत मराठवाड्यात तब्बल २४ हजार ७०० लोकांचे स्थलांतर करण्यात आले.
मराठवाड्यातील पूरस्थितीने रविवारी आणखी विदारक स्वरूप धारण केले. रविवारी सकाळपर्यंत विभागात आणखी १९८ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. दुसरीकडे जायकवाडी, माजलगाव, मांजरा, शिवना टाकळी आदी धरणांमधून नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या हजारो गावांमध्ये हाहाकार उडाला आहे. ठिकठिकाणी बचाव कार्य सुरू आहे.
आठवडाभरापासून संपूर्ण मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवारपर्यंत सर्वच जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाल्याने धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी जायकवाडी, माजलगाव, येलदरी, मांजरा आदी धरणांमधून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पैठणसह नदीकाठांवरील गावे आणि शहरे पाण्याखाली गेली. परिणामी मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आदी जिल्ह्यांत प्रशासनाकडून पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी बचाव मोहीम राबविण्यात आली. मराठवाड्यात दोन दिवसांत २४ हजार ७०० लोकांना स्थलांतरित करण्यात आले. मात्र रविवारी रात्रीपासून सर्वच जिल्ह्यांत पाऊस थांबला. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. परिणामी, स्थलांतरितांपैकी ७ हजार जण पुन्हा आपल्या घरी परतले आहेत. तर दुसरीकडे जायकवाडी धरणातून अजूनही दीड लाखाहून अधिक क्युसेकने गोदावरीत पाणी सोडण्यात येत आहे. मांजरा, माजलगाव, येलदरी, सिद्धेश्वर धरणातून विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नांदेड, पैठणसह नदीकाठावरील गावांमधील पूरस्थिती अद्यापही कायम आहे.
मराठवाड्यात जूनपासून आतापर्यंत खरिपाच्या एकूण क्षेत्रापैकी तब्बल ३१ लाख ९८ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. महसूल प्रशासनाकडून यातील २३ लाख ६० हजार हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. हे प्रमाण ७३ टक्के इतके आहे. उर्वरित नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ६ लाख ७५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यातही ६ लाख ५४ हजार, धाराशिव जिल्ह्यात ४ लाख ४९ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही प्रत्येकी दोन लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतीपिकांचे आणि सार्वजनिक व खासगी मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्य सरकारने विभागातील शेतकऱ्यांसाठी पंधराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सध्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. परंतु त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना आधी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी (दि. २९) दिली.
मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात यंदा अतोनात नुकसान झाले आहे. आतापर्यंत सुमारे ३२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, मका ही हाताशी आलेली पिके नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आतापर्यंत चौदा आदेश जारी करून सुमारे पंधराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबत विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले की, शासनाने पंधरा कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट मदत जमा करण्यात येईल. त्यासाठी सध्या याद्या बनविण्याचे काम सुरू आहे. परंतु यावेळी सर्वच बाधित शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागणार आहे. ज्यांनी आधी ई-केवायसी केली असेल त्यांनाही ई-केवायसी करावी लागणार आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल, परंतु ती जमा झाल्यानंतर बँकांकडून त्यांच्याकडील कर्जापोटी ही रक्कम कपात होण्याची भीती व्यक्त होत आहे. याविषयी विभागीय आयुक्तांनी सांगितले की, ही रक्कम तातडीची मदत म्हणून दिली जात आहे. त्यामुळे बँकांना ती कर्जाच्या रकमेपोटी कपात करता येणार नाही. तशा सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत.
मागील चार दिवसांत अतिपावसामुळे पंचनाम्यांना ब्रेक लागला होता. परंतु आता पंचनाम्यांनी वेग घेतला आहे. आतापर्यंत सुमारे ८० टक्के नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. उर्वरित पंचनामेही येत्या चार दिवसांत पूर्ण होतील, असे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.