

छत्रपती संभाजीनगर : गोवंश तस्करांवर मोक्का लावून पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी टोळीला दणका दिल्यानंतर पोलिसांनी आता या माफियांनी ज्या भागात माज केला, तिथेच येथेच्छ प्रसाद देत अनवाणी धिंड काढली.
रविवारी सकाळी ठीक 8 वाजता जिन्सी, निजामगंज आणि बायजीपुरा भागातील ज्या गल्लीबोळांमध्ये दुधाच्या गोठ्याआड जनावरांची निर्घृण कत्तल व्हायची, त्याच भागात पोलिसांनी 6 मुख्य आरोपींना फिरविले. पोलिसांनी भरवस्तीत या तस्करांचे मनोधैर्य पूर्णपणे खच्ची केले.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी पदभार घेतल्यापासून शहरातील ड्रग्ज माफिया, गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख, कुख्यात गुन्हेगार यांची पुरती नशा उतरवली आहे. या गुन्हेगारांचा धिंड पॅटर्न राज्यभरात चर्चेत आला आहे.
दरम्यान, बकरी ईदच्या पूर्वसंध्येला जिन्सी भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवून पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात कत्तलीसाठी डांबलेल्या तब्बल 131 गोवंशाची पोलिसांनी सुटका केली होती. त्यानंतर या टोळीतील 9 आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. वारंवार गोवंश तस्करी करणारे गुन्हेगार पोलिसांच्या थेट रडारवर आले आहे. सहा गोवंश तस्करांची धिंड काढल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुर्तफा गर्दी केल्याचे दिसून आले.