

Madhya Pradesh Merchant Fraud in Paithan
पैठण : सोन्याचे गुप्तधन मिळवून देण्याच्या आमिषाने मध्यप्रदेशातील सराफा व्यापाऱ्याला पैठण तालुक्यात बोलावून त्याच्याकडील दहा लाख रुपये लुटल्याची घटना वडजी शिवारात घडली. व्यापाऱ्याला कुऱ्हाड आणि लोखंडी रॉडने मारहाण करून पैसे लुटणाऱ्या टोळीला पाचोड पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणात सात जणांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, लुटीतील मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मध्यप्रदेशातील सिधी जिल्ह्यातील रामपुरी नाईकिन येथील रमाशंकर लालूप्रसाद सोनी (४६) हे सोन्या-चांदीचे व्यापारी आहेत. मध्यस्थामार्फत त्यांना पैठण तालुक्यातील वडजी शिवारात गुप्तधनातील सोन्याचे दागिने देण्याच्या बहाण्याने मंगळवारी (दि. १५) सकाळी साडेअकराच्या सुमारास बोलावण्यात आले होते.
सोनी वडजी शिवारात आल्यानंतर संबंधित टोळीने त्यांना सुमारे ४०० ग्रॅम वजनाच्या सोन्यासारख्या दिसणाऱ्या बनावट टिकल्या दाखविल्या. त्यानंतर बळजबरीने त्यांच्या पिशवीत ठेवलेले दहा लाख रुपये हिसकावून घेतले. तसेच सोनी यांना कुऱ्हाड आणि लोखंडी रॉडने मारहाण करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेनंतर सोनी यांनी पाचोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत प्रकाश आयजी चव्हाण, नर्मदा आयजी चव्हाण, आयबी आयजी चव्हाण, विक्रम आयजी चव्हाण आणि आकाश आयजी चव्हाण (सर्व रा. वडजी, ता. पैठण) यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध मारहाण, फसवणूक आणि दहा लाख रुपये लुटल्याचे नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाबाबत सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित आणि विहामांडवा पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक श्रीहरी विजय बोबडे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. त्यातून लुटमार व फसवणुकीच्या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान, आरोपींकडून लुटीतील मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
स्वस्तात सोन्याचे गुप्तधनातील दागिने मिळणार असल्याच्या आमिषाला बळी पडून मध्यप्रदेशातील व्यापारी मध्यस्थामार्फत थेट पैठण तालुक्यात आला. त्यामुळे या मध्यस्थाचा आरोपी टोळीशी काही संबंध आहे का, तसेच व्यापाऱ्याला वडजी शिवारात आणणारा हा मध्यस्थ नेमका कोण, याबाबत परिसरात विविध चर्चा सुरू आहेत. या बाबींचाही पोलिस तपासात उलगडा होण्याची शक्यता आहे.