

Rescue of cattle brought for slaughter in Jalna city
जालना, पुढारी वृत्तसेवा : गेवराई बाजारहून कत्तलीसाठी जालना शहरात नेले जात असलेले गोवंश वाहतूक करणारे वाहन चंदनझिरा हद्दीत गुरुवार दि. ४ रोजी पकडण्यात आले. वाहन चंदनझिरा पोलिसांनी जप्त केले असून, गोवंशाची सुटका करण्यात आली आहे.
दरम्यान, गेवराई बाजार येथून सात बैल आणि एक गाय बोलेरो पिकअपमध्ये कोंबून जालना शहरात आणल्या जात होते. ही माहिती गौरक्षकांना मिळाली. गौरक्षकांनी वाहनचालकास जनावरांविषयी चौकशी केली असता सदरील जनावरे जुना जालन्यातील आवेस कुरेशी यांच्याकडे जात असून पिकअप वाहन किरायाने असल्याचे सांगितले. तद्वंतर वाहन थेट चंदनझिरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले.
चंदनझिरा पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून गोवंशांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करण्यात येऊन सदरील गोवंश शहरातील गौशाळेत सोडण्यात येणार आहेत. वाहन चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आठवड्यातील तिसरी कारवाई आहे.