

Sambhajinagar News: Young woman raped, trainee police sub-inspector arrested
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
लग्नाचे आमिष दाखवून प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकाने तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याचा प्रकार सोमवारी (दि.१७) उघडकीस आला होता. प्रकार २४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी क्रांती चौक भागातील एका कॅफेत घडला.
भागवत ज्ञानोबा मुलगीर (रा. महातपुरी, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे आरोपीचे नाव असून, तो सध्या पोलिस उपनिरीक्षकाचे प्रशिक्षण घेत होता. क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच बुधवारी (दि.१९) त्याला नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमी येथून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांनी दिली.
अधिक माहितीनुसार, आरोपी भागवत मुलगीर याची एका तरुणीसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी क्रांती चौक भागातील एका कॅफेत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले.
पीडिता गर्भवती राहिल्याने तिने मुलगीरला सांगितले. मात्र, त्याने पीडितेला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण केली. तुझे फोटो व्हायरल करतो, अशी धमकी देऊन गोळी देऊन गर्भपात घडवून आणला. पीडितेने सर्व प्रकार आरोपी मुलगीरचे वडील आणि बहिणीला सांगितला.
तेव्हा त्या दोघांनीही पीडितेला शिवीगाळ करून तुला जे करायचे ते कर, आम्ही कोण आहोत ते तुला माहीत नाही, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने शनिवारी (दि. १५) क्रांती चौक पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख करत आहेत.