

Sambhajinagar News: Supply Water at Full Capacity Through the 900mm Pipeline
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उन्हाची तीव्रता वाढल्याने शहरात पाण्याची मागणी देखील वाढली आहे. दररोज शहरात १५५ एमएलडी पाणी येऊनही टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधून पाण्याच्या वेळा निश्चित करा, ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरूकरा, महावितरणच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पाण्याच्या वेळेनुसार वीज खंडाचा काळ ठरवा, असे आदेश बुधवारी महापालिका पाणीपुरवठा विभागाला महापौर समीर राजूरकर यांनी दिले.
यावेळी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, महापालिका आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त शहर अभियंता अनिल तनपुरे, कार्यकारी अभियंता वसंत भोये, उपअभियंता किरण धांडे, सहायक उपअभियंता महेश चौधरी, मिलिंद भांबरे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार केलेली ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून आता पूर्ण क्षमतेने पाणी घेणे आवश्यक आहे. या जलवाहिनीसाठी आवश्यक स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र देखील तयार आहे. त्यामुळे ९०० ची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यावर विशेष भर द्या, असे आदेश महापौरांनी दिले.
सद्यस्थितीत शहराला मिळणाऱ्या १५५ एमएलडी पाणीपुरवठ्यात या जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू केल्यास शहराचा पाणीपुरवठ्यात किमान १७एमएलडीची वाढ होईल, अ असून त्यामुळे शहरातील पाण्याच्या तुटवड्यात मोठ्या प्रमाणात घट होण्यास मदत होणार आहे.
महावितरणशी समन्वय ठेवा
महावितरणाकडून सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे देखील पाणीपुरवठा विस्कळीत होतोय, असे काही अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांशी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नियमितपणे समन्वय ठेवावा, नागरिकांशीदेखील पाणी आल्यानंतर विद्युत मोटार सुरू केल्यावर घरातील इतर विद्युत उपकरणे बंद करावीत. ज्यामुळे वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर लोड येऊन त्या ट्रीप होणार नाहीत, असे उपमहापौर राजेंद्र जंजाळ म्हणाले.
१७ एमएलडी वाढेल सद्यस्थितीत शहराला १५५ एमएलडी पाणी मिळत आहे. ९०० मि.मी.ची जलवाहिनी कार्यान्वित केल्यानंतर त्यातून शहराला किमान १७ एमएलडी वाढीव पाणी मिळेल, असे शक्यता महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी व्यक्त केली.