

Sambhajinagar news Student beaten by a gang
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रात्रीच्या सुमारास रस्त्याने फेरफटका मारणाऱ्या एका २६ वर्षीय विद्यार्थ्याला अडवून तुझे नाव काय, वडील काय करतात? अशी चौकशी करत हात मिळवला आणि पाठ फिरवून पुढे जाताच लोखंडी साखळीने डोक्यात मारून रक्तबंबाळ केले. जखमी तरुण जीव वाचवण्यासाठी पळत असताना आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले व बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. १४) रात्री ११:३० ते १२ वाजे दरम्यान बन्सीलाल नगरातील विपुल स्टेशनरीसमोर घडली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी चौघा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अरविंद परमेश्वर सोनवणे (१९, रा. गणपती गार्डनजवळ, बन्सीलाल नगर), सौरभ भाऊसाहेब ढवले (रा. कर्णपुरा), रामदास राजू सोनवणे (२६, रा. विटखेडा गल्ली नं. ७, पैठण रोड), गोकुळ अशोक गायकवाड (२८, रा. गणपती मंदिराजवळ, पन्नालाल नगर) अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी अवनिश सुनील पाटील (२६, रा. प्लॉट नं. ३४, राजननगर, बन्सीलाल नगर जवळ) याच्या तक्रारीनुसार, तो बुधवारी (दि. १४) रात्री नऊ वाजेच्या सुमारास जेवणानंतर घरापासून ते पटवर्धन हॉस्पिटलच्या दिशेने शतपावली करण्यासाठी निघाला होता. रात्री ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास तो बन्सीलाल नगर परिसरातील विपुल स्टेशनरीसमोर आला असता, अनोळखी तीन ते चार तरुणांनी त्याला रस्त्यात अडवले.
त्या तरुणांनी अवनिशला, तुझे नाव काय? तुझा पत्ता काय? तुझे वडील काय करतात? अशी विचारणा केली आणि हात मिळवण्यासाठी पुढे हात केला. अवनिशने हात मिळवून वाद नको म्हणून पुढे चालू लागला. मात्र, तो काही पावले पुढे जाताच, एका आरोपीने पाठीमागून धावत येऊन हातातील लोखंडी साखळीसारख्या वस्तूने अवनिशच्या डोक्यात मारून रक्तबंबाळ केले.
जखमी अवस्थेत तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पुढे पळत असताना, आरोपींनी त्याच्या मागे धावून त्याला पकडले. त्यानंतर चौघांनीही त्याला खाली पाडून बेदम मारहाण केली. या झटापटीत अवनिशच्या गळ्यातील चेन तुटून रस्त्यावर कुठे तरी पडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन आरोपींना पकडून वेदांतनगर ठाण्यात आणले. पुढील तपास हवालदार चव्हाण करत आहेत.