

Suspicious stock of food items worth Rs 4.5 crore seized
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सणासुदीच्या तोंडावर अन्न पदार्थात भेसळ करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध एफडीएने कारवाईचा बडगा उगारला आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील बिडकीन येथील फ्रिओ वेअरहाउसिंग आणि शिवराई, गंगापूर येथील मराठवाडा कोल्ड स्टोरेज या दोन मोठ्या शीतगृहांवर शनिवारी छापे टाकून गुळ, मिरची पावडर, मनुका असा तब्बल १ लाख २७ हजार ४८० किलो वजनाचा आणि ४ कोटी १८ लाख रुपयांचा विना-लेबल व संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच परवानेही निलंबित करण्यात आले.
बिडकीन येथील मे. फ्रिओ वेअरहाउसिंग या शीतगृहाची एफडीए पथकाने शनिवारी अचानक तपासणी केली. यात अन्नपदार्थ टिकवण्यासाठी आवश्यक असलेले फ्रीजर्स किंवा चिलर्स योग्य प्रकारे कार्यरत नव्हते. कोल्ड रूमची देखभाल नसून माल अस्ताव्यस्त साठवला गेला होता. पेस्ट कंट्रोलची कोणतीही यंत्रणा नव्हती आणि स्वच्छतेचे वेळापत्रक पाळले जात नव्हते.
कामगारांची वार्षिक वैद्यकीय तपासणी झाली नव्हती; तसेच त्यांना अॅप्रन, हातमोजे वा टोप्या नसल्याने मिरची पावडर, मनुका-किसमिस असा तब्बल १,६५,८०५ किलो आणि ३ कोटी ८९ लाख ४० हजार ३५० रुपयांचा साठा जप्त केला. दुसऱ्या कारवाईत शिवराई येथील मराठवाडा कोल्ड स्टोरेजवर अनेक त्रुटी आढळल्याने मिरची पावडर, गुळ आणि पाश्चराइज्ड बटर असा एकूण ३१,६७५ किलो आणि ३० लाख ७हजार२८४ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.