Fraud Case : ७ कोटी कर्जाचे आमिष दाखवून व्यावसायिकाला १.०९ कोटींचा गंडा

दिल्लीच्या फायनान्स कंपनीच्या नावाने फसवणूक; बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र बनवून केले ब्लॅकमेल, ८ जणांवर गुन्हा, एक अटकेत
Sambhajinagar News
Sambhajinagar News : ७ कोटी कर्जाचे आमिष दाखवून व्यावसायिकाला १.०९ कोटींचा गंडाfile photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीच्या युनायटेड वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडून व्यवसायासाठी ७ कोटी रुपयांचे कर्ज अवघ्या १५ दिवसांत मिळवून देण्याचे आमिष दाखवून, व्यावसायिकाला तब्बल १ कोटी ९ लाख ८५ हजारांना भामट्यानी गंडा घातला. या टोळीने लॉगिन फी, इन्शुरन्स, जीएसटीच्या नावाखाली तसेच बनावट वैद्यकीय तयार करून व्यावसायिकाला ब्लॅकमेल करत रक्कम उकळली. हा प्रकार १३ ऑगस्ट २०२५ ते ४ एप्रिल या दरम्यान स्वान इंटरप्राइजेस, पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर, टीव्ही सेंटर येथे घडला. याप्रकरणी मंगळवारी (दि.११) सिडको पोलिस ठाण्यात ८ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : महामार्गावरील साईड पट्ट्यांवरील खड्डे धोकादायक

प्रमाणपत्र धर्मेंद्र विनोदानंद झा (३६, रा. जयभवानीनगर, मुकुंदवाडी) असे अटकेतील तर मोहिनी धर्मेंद्र झा, हरजितसिंग रुपराह, आरव अग्रवाल, अशोक सिंघल, दीपक अरोरा (चौघे रा. दिल्ली), गणेश देशमुख आणि अमृता गणेश देशमुख (दोघे रा. जवाहर कॉलनी) अशी फरार आरोपींची नावे आहेत. धर्मेंद्रला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.

फिर्यादी प्रकाश नारायणराव रोहिणीकर (६०, रा. मोर्या पार्क, हसूल) यांच्या तक्रारीनुसार त्यांचे टीव्ही सेंटर भागात स्वान एंटरप्रायजेस नावाचा डिझाईन आणि प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे. जुलै २०२५ मध्ये आरोपी गणेश देशमुख याने फायनान्स कंपनीचा मध्यस्थ धर्मेंद्र झा याला रोहिणीकर यांच्या कार्यालयात आणले. युनायटेड वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस, दिल्ली यांच्याकडून ७ कोटींचे कर्ज १५ दिवसांत मिळवून देण्याची हमी त्यांनी दिली.

Sambhajinagar News
Ganja Seized : नारेगावच्या बलूच गल्लीतून पुन्हा दीड किलो गांजा जप्त

त्यानंतर ४ ऑगस्ट २०२५ रोजी रोहिणीकर यांना दिल्लीला नेऊन तीस हजारी कोर्ट परिसरातील दीपक अरोरा यांच्या कार्यालयात हरजितसिंग रुपराह आणि आरव अग्रवाल यांच्याशी त्यांची भेट घडवून आणण्यात आली. लॉगिन फी, इन्शुरन्स, जीएसटी आणि कमिशन जमा केल्यास कुठल्याही कागदपत्रांशिवाय १५ दिवसांत ७कोटी रुपये खात्यात जमा होतील, असे आश्वासन या भामट्यांनी दिले.

अशी उकळली १ कोटी ९ लाखांची रक्कम

प्रति कोटी १ लाख सीएची फी आहे, कर्ज रकमेच्या ५ टक्के अधिक १८ टक्के जीएसटी रक्कम जमा करावी लागेल. त्यानंतर अग्रीमेंटवर संभाजीनगर आणि दिल्ली कोर्टात सही करायला या अशा थापा मारल्या. कर्ज मिळण्याच्या आशेने रोहिणीकर यांनी १४ ऑगस्ट २०२५ ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांवर आणि रोख स्वरूपात तब्बल १ कोटी ९ लाख ८५ हजार १०० रुपये दिले. अशोक सिंगल याच्या कॅनरा बँकेच्या खात्यावर ६७ लाख ८० हजार रुपये ट्रान्सफर केले. हरजितसिंग याच्या येस बँकेच्या खात्यावर ३ लाख रुपये पाठवले. धर्मेंद्र झा याला तब्बल ३८ लाख रुपये रोख स्वरूपात दिले. याशिवाय गणेश देशमुख याची पत्नी अमृता देशमुख आणि धर्मेंद्रची पत्नी मोहिनी झा यांच्याही खात्यावर पैसे वळवण्यात आले.

बनावट सर्टिफिकेट बनवून ब्लॅकमेल

पैसे उकळल्यानंतर आरोपींनी कर्ज देण्यास टाळाटाळ सुरू केली. वैद्यकीय प्रमाणपत्राची अट घालत रोहिणीकर यांनी जिल्हा रुग्णालयातून काढलेले सर्टिफिकेट रिजेक्ट करून पुन्हा बनाव रचला. त्यानंतर आरोपी धर्मेंद्र झा याने रोहिणीकर यांना पुन्हा जिल्हा रुग्णालय, चिकलठाणा येथील चीफ मेडिकल ऑफिसर यांची स्वाक्षरी असलेले एक बनावट फिटनेस सर्टिफिकेट आणून दिले आणि त्यावर त्यांची सही व अंगठा घेतला.

काही दिवसांनी हरजितसिंगने फोन करून मेडिकल सर्टिफिकेट बनावट असल्याचे सांगून प्रकरण मॅनेज करण्यासाठी आणखी १० लाख रुपये उकळले. तसेच त्यांच्याकडून कर्जाच्या रीपेमेंटचे ८४ धनादेश (चेक) आणि कोऱ्या कागदांवर सह्या व अंगठेही घेण्यात आले. वारंवार विनंती करूनही कर्ज न मिळाल्याने रोहिणीकर यांनी सिडको ठाणे गाठून मंगळवारी (दि.११) तक्रार दिली. फरार भामट्यांच्या शोधासाठी तपास अधिकारी सहायक निरीक्षक योगेश गायकवाड यांचे पथक दिल्लीला गेले आहे.

कर्जाच्या नावाखाली गंडविणाऱ्या टोळ्या सक्रिय

शहरात गेल्या काही दिवसांमध्ये अल्प व्याजदरात, विनातारण आणि तात्काळ कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्याच शहरात सक्रिय असल्याचा दिसून येत आहे. अडचणीत आलेले व्यावसायिक व उद्योजकांना टार्गेट करून दिल्ली, मुंबई, उत्तर भारतातील काही महाठग स्थानिक दलालांसोबत फसवणुकीचे रॅकेट चालवीत असल्याचे उघड होत आहे. याआधीच्या अशाचप्रकारे कर्जाच्या आमिषाने गंडविल्याची ३ प्रकरणे घडली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news