

Sambhajinagar News : 32 'Left Turns' will be remove in the city
प्रमोद अडसुळे
छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रमुख रस्त्यांवर अनेक वाहनधारक डावी बाजू अडवून धरतात त्यामुळे डावीकडे जाणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मनपाने टाकलेले प्लास्टिकचे बोलार्ड कुचकामी निघाल्याने लाखो रुपये पाण्यात गेले. सध्या सर्व रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरू असून रस्ते आणखी प्रशस्त होणार आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांसह मनपाने नव्याने शहरातील प्रमुख ३२ लेफ्ट टर्न मोकळे करण्यासाठी सर्वेक्षण करून आराखडा तयार केला आहे. वाहनधारकांना लेफ्ट टर्न घेताना अडथळा निर्माण होणार नाही, या दृष्टीने सिमेंटचे बेट तयार करून डावी बाजू कायमस्वरूपी वेगळी केली जाणार आहे. त्यामुळे डावीकडे जाणारी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहणार आहे. येत्या काही महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे.
शहरातील प्रमुख मागाँवर सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहनांची मोठी वर्दळ असते. याच वेळी सिग्नल सुरू असतात. काही वाहनधारक उजवीकडे जायचे असताना डावी बाजू अडवून धरतात. मध्यंतरी मनपाने प्लास्टिक बोलार्ड टाकून डावी बाजू मोकळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयोग फेल गेला. ज्या वाहनधारकांना लेफ्ट टर्न घेऊन पुढे जायचे असते, त्यांना सिग्नल सुटेपर्यंत थांबावे लागते. लेफ्ट टर्न सुटसुटीत, अडथळाविरहित करण्यासाठी मनपा आणि वाहतूक पोलिसांकडून ठोस पावले उचलण्यात येत नव्हती. परिणामी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, आता दोन्ही विभागाने कायमस्वरूपी पर्याय शोधून पुणे, मुंबईच्या धर्तीवर डावी बाजूची वाहतूक स्वतंत्रपणे सुरळीत करण्यासाठीचा आराखडा तयार केला आहे.
नगरनाका, महावीर चौक, सेव्हन हिल, सिडको चौक, टीव्ही सेंटर, आंबेडकर चौक, सावरकर चौक, सेंट्रल नाका, जवाहर नगर, क्रांती चौक, गोपाल टी, रोपळेकर चौक, आकाशवाणी, चिकलठाणा गाव, केंब्रिज चौक, हडको कॉर्नर, लेबर कॉलनी, कलेक्टर ऑफिस, सूतगिरणी चौक, दर्गा चौक, गजानन मंदिर चौक, हर्षल टी, शरद टी, बीडबायपास, अहिल्यादेवी होळकर चौक, रेल्वेस्टेशन चौक, जुबली पार्क, मिलकॉर्नर आदींसह अन्य चौक्यांचा समावेश आहे.
डाव्या बाजूला उभा राहणाऱ्या वाहनधारकाला उजवीकडे वळणे शक्य होणार नाही. त्यामुळे डावी बाजूची वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील. उजवीकडे जाण्यासाठी डाव्या बाजूच्या लेनमध्ये गेलेल्या वाहनधारकाला डावीकडेच जाऊन मोठा फेरा घेऊनच यावे लागले अशी तरतूद करण्यात आली आहे.