

छत्रपती संभाजीनगर : शहरवासीयांना नवीन पाणीपुरवठा योजनेच्या 2500 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून येत्या 22 जूननंतर पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असे शपथपत्र बुधवारी (दि. 6) पाणीपुरवठा योजनेबाबत उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालय नियुक्त उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. हितेन वेनेगावकर यांना सादर केले. त्यासोबतच पाणीपुरवठा बाबतचा कालबद्ध कार्यक्रमदेखील सादर करण्यात आला.
विभागीय आयुक्त जी श्रीकांत हे सुनावणीत ऑनलाईन सहभागी झाले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (एमजेपी) सदस्य सचिव रंगा नाईक यांच्यासमवेत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त त्यांनी सादर केले. एमजेपी व जीव्हीपीआरच्या वतीने अठरा पाण्याच्या टाक्या तयार असल्याचे सांगितले.
बंगाल निवडणूक झाल्यामुळे आता कामगार परत येण्यास सुरुवात झाल्याने मनुष्यबळ वाढविण्यात येईल, असे न्यायालयासमोर सांगण्यात आले. मनपाच्या वतीने ॲड. संभाजी टोपे यांनी बाजू मांडली. कंत्राटदारातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे, मजिप्रा ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख, न्यायालयाचे मित्र ॲड. शंभुराजे देशमुख यांनी काम पाहिले.
जलवाहिनीचीही मिसिंग लिंक शोधा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना पदाधिकारी रोहण आचलिया यांनी एक निवेदन पाठविले असून त्यात मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरची मिसिंग लिंक जोडून आपण आमचा प्रवास सुसाट केल्याबाबत अभार व्यक्त केले. त्यासोबतच तंत्रज्ञान आणि विकासात आपण फास्ट आहेत. त्यामुळे आम्हाला वाटलं होतं, तुम्ही चुटकी वाजवताच छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणी योजनेची मिसिंग लिंक शोधाल. परंतु, आता असे वाटते की, पाणीपुरवठा योजनेतील मिसिंग लिंक शोधणे म्हणजे ॲमेझॉनच्या जंगलात हरवलेला खजिना शोधण्यापेक्षा अधिक कठीण आहे. 2019 ते 2022 चा बेक वगळता मागील 9 वर्षांपासून सत्ता तुमच्याच हातात आहे. मग ही जलवाहिनी अडकली तरी कुठे? की तिचा मिसिंग लिंक देखील डोंगराखालून बोगदा पाडून शोधयचा आहे. आता जनतेच्या संयमाचा अंत होतोय, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले.
उच्च न्यायालयाचे निर्देश
जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाण्याची चाचणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे 9 ते 12 मे पर्यंत जॅकवेलपासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणणे.
19 मेपर्यंत जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी स्थिर करणे. 21 ते 22 मे पर्यंत जलशुद्धीकरण केंद्रातून एमबीआरमध्ये पाणी चढवणे.
18 जलकुंभ तयार असल्याने 22 मे ते 12 जूनपर्यंत टेस्टिंग करा. 12 जूननंतर एमबीआरहून 18 जलकुंभांना पाणी पोहचवा.
12 जूननंतर पाणी नागरिकांना वितरित करण्यास सुरुवात करा.