

छत्रपती संभाजीनगर : शहर विकास आराखड्यातील संभाजीपेठ ते मोंढा या १८ मीटर (६० फूट) रुंदीच्या प्रस्तावित रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी महापालिकेने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अंगुरीबाग ते मोंढा रोड परिसरातील बाधित मालमत्त-ाधारकांना महापालिकेच्या झोन क्रमांक २ कार्यालयामार्फत मंगळवारी (दि. २६) नोटीस बजावण्यात आल्या आहेत. संबंधितांना आठ दिवसांच्या आत बांधकामासंदर्भातील आवश्यक कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संभाजीपेठ ते मोंढा हा रस्ता शहर विकास आर-ाखड्यानुसार १८ मीटर रुंदीचा प्रस्तावित असून, या मार्गातील अनेक बांधकामे रस्ता विस्तारीकरणात बाधित ठरत आहेत. यापूर्वीही या परिसरातील मालमत्तांना नोटीस देण्यात आल्या होत्या, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे पुढील प्रक्रिया रखडली होती.
आता महापालिकेने या मार्गावर पुन्हा लक्ष केंद्रित केले असून, मागील काही दिवसांत ३३ मालमत्ताधारकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यानंतर मंगळवारी आणखी २० मालमत्तांना नोटीस बजावण्यात आल्या असून, आतापर्यंत एकूण ५३ मालमत्तांचा नोटीशीत समावेश आहे.
महापालिकेच्या झोन क्रमांक २ कार्यालयामार्फत ही कारवाई करण्यात आली. निश्चित मुदतीत मालमत्ताधारकांनी आपले म्हणणे आणि बांधकाम मंजुरीसह आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे.
महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील मालमत्ताधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात अधिक हालचाली वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे-
वाहतूक कोंडी सुटण्यास होणार मदत
संभाजीपेठ ते मोंढा हा मार्ग शहरातील महत्त्वाच्या आणि अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक मानला जातो. या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होईल. भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता या मार्गावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने विकास आराखड्यातील रस्ते लवकरात लवकर मोकळे करणे आवश्यक असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.