

छत्रपती संभाजीनगर : इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून एका ३५ वर्षीय विवाहितेचा विश्वास संपादन करत, चॅटिंगचे स्क्रीनशॉट नवऱ्याला दाखवण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपी अभियंत्याने संबंधित महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. २७) बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वैभव विजय पाटील असे या आरोपीचे नाव आहे. तो जलसंपदा विभागात उपविभागीय अभियंता असून, गुन्हा दाखल होताच तो पसार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३५ वर्षीय महिला उल्कानगरी भागात राहते. १२ जुलै २०२५ रोजी आरोपी वैभव पाटील याने त्याच्या इन्स्टाग्रामवरून पीडितेच्या आयडीवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. पीडितेने ती स्वीकारल्यानंतर त्याने ओळख वाढवली व विश्वासात घेऊन तिचा मोबाईल नंबर मिळवला. त्यानंतर त्यांच्यात व्हॉट्सअॅपवर चॅटिंग सुरू झाली. १६ जुलै २०२५ रोजी दुपारी आरोपी वैभवने पीडितेला भेटण्यासाठी उल्कानगरी चौकात बोलावले. तिथे आल्यानंतर कॉफी पिण्याच्या बहाण्याने त्याने तिला आपल्या फॉर्च्यूनर कारमध्ये बसवले आणि थेट एन-१२ येथील एका हॉटेलमध्ये नेले.
तिथे गेल्यानंतर त्याने त्यांच्यात झालेल्या चॅटिंगचे रेकॉर्ड नवऱ्याला दाखवण्याची धमकी दिली. बदनामीच्या भीतीने घावरलेल्या पीडितेवर त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याच वेळी त्याने स्वतःच्या सॅमसंग अल्ट्रा आणि आयफोन मोबाईलमध्ये तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढले. दरम्यान, आरोपीच्या वडीलांनी पीडितेला काय पाहिजे ते सांग, गोस्ट मिटवून टाकू, असेही म्हटल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
कर्तव्यावर दांडी, शहरात रंगले प्रताप
आरोपी वैभव पाटील हा जलसंपदा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प, विभागीय पथक क्र. ४, आखाडा बाळापूर येथे उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत आहे. त्याची ड्यूटी आखाडा बाळा-पूर (जि. हिंगोली) येथे असताना तो कामकाजाच्या वेळेत वारंवार छत्रपती संभाजीनगर शहरात कसा आला? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको एन-२ भागात त्याचा बंगला आहे. शासकीय कर्तव्यावर असताना त्याने शहरात येऊन हे प्रताप केल्याने त्याच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपी विवाहित आहे. पीडिताही विवाहित असून, दोघांना मुलबाळ आहे. मात्र आरोपी वैभवने पीडितेला जाळ्यात ओढून तिला ब्लॅकमेल करत अत्याचार केल्याचे समोर आले आहे.