

Sambhajinagar Karnapura Yatra Shri Balaji Rath devotees
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराचे ग्राम दैवत कर्णपुरा देवीच्या यात्रेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठा उत्साह राहिला. शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि.२) सायंकाळी ६.३० वाजता श्री बालाजींची पालकमंत्री संजय शिरसाट, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते महाआरती करून वेंकटरमण गोंविदाच्या गजरात रथ ओढून सिमोल्लंनास सुरुवात झाली. ठिकठिकाणी बालाजी रथावर रेवड्यांची उधळण करण्यात आली. तर परंपरेनुसार चार ठिकाणी आरती व दोन ठिकाणी औक्षण करण्यात आले.
यावेळी माजी महापौर नंदू घोडेले, गजानन बारवाल, छावणी परिषदचे माजी उपाध्यक्ष करणसिंग काकस, संजय मरमट, राजू राजपूत, श्री बालाजी मंदिराचे विश्वस्त अभय पद्माकर पुजारी, अशोक दिनकर पुजारी, संजय राजाराम पुजारी, अनिल प्रभाकर पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध कर्णपुरा देवीची यात्रा प्रसिद्ध आहे. या यात्रेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून दरवर्षी लाखो भाविक कर्णपुर्यात येत असतात. यंदाही राज्यात सतत मुसळधार पाऊस सुरू असतानाही लाखो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. पाचव्या, सातव्या आणि नवव्या माळीच्या दिवशी देवी मंदिरासमोर लांबलचक रांगा लागल्या होत्या. यंदा यात्रा ११ दिवस राहिली असून, शेवटच्या दिवशी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. मध्यरात्रीपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी होती.
दरम्यान, सायंकाळी ६ वाजता श्री बालाजी मंदिरात पोलिस आयुक्त पवार यांच्या हस्ते महाआरती झाली. त्यानंतर बालाजींना रथामध्ये बसवून पुन्हा सामूहिक आरती घेऊन वेंकटरमण गोविंदाचा जयघोष करीत रथाचे चऱ्हाट ओढण्यास सुरुवात झाली. सायंकाळी ६.३० वाजता रथ बालाजी मंदिर येथून सीमोल्लंघनासाठी निघाल्यानंतर भाविकांनी रथावर रेवड्यांची उधळण करण्यास सुरुवात केली. या रेवड्या अनेक जण झेलण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. कर्णपुऱ्याच्या सीमेवर उड्डाणपुलाजवळ परंपरेनुसार मालखरे कुटुंबीयांच्या हस्ते बालाजींची आरती करण्यात आली. सीमोल्लंघन करीत रथ माघारी बालाजी मंदिराकडे वळले. या आरतीनंतर बालाजींच्या भक्तिमय वातावरणात रथाचे सीमोल्लंघन पार पडले. भाविकांनी दर्शनासाठी रथाच्या मार्गावर प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले.
परंपरेनुसार रथाची पहिली आरती पोलिस आयुक्तांच्या हस्ते होते. त्यानंतर दुसरी आरती रथ ओढण्यापूर्वी सामूहीकरीत्या केली जाते. तसेच तिसरी आरती सीमोल्लंघनावेळी मालखरे कुटुंबीयांच्या हस्ते होते. त्यानंतर चौथी आरती ही पंचमुखी हनुमान मंदिरासमोर वैष्णव कुटुंबीयांच्या हस्ते होत असते. त्यानंतर काही अंतरावर रथाचे राजपूत समाजाच्या वतीने औक्षण केले जाते आणि पुढे रथाच्या सीमोल्लंघनाच्या समारोपावेळी मंदिर विश्वस्त पुजारी कुटुंबाच्या वतीने औक्षण होते, असे अभय पुजारी यांनी सांगितले.