

Mangesh Sable's health deteriorates
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान व इतर विविध मागण्यांसाठी फुलंब्री तालुक्यातील सरपंच मंगेश साबळे यांचे सिल्लोड तहसील कार्यालयासमोरील आमरण उपोषण चौथ्या दिवशी गुरुवारी (दि.२) सुरूच होते. सोमवारपासून हे उपोषण सुरू असून, आंदोलनकर्ते मंगेश साबळे यांची प्रकृती खालावली आहे. तर उपोषणकर्ते यांच्याशी तहसीलदार सतीश सोनी यांनी चर्चाही केली. मात्र तोडगा निघाला नाही.
ओला दुष्काळ जाहीर करुन प्रति एकर ५० हजारांची सरसगट मदत द्यावी. शेती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकर १ लाखाची मदत द्यावी. पुरात जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति जनावर ५० हजार द्यावे. रब्बी हंगामासाठी बि बियाणे, खत मोफत उपलब्ध करुन द्यावे.
२०२५- २६ शैक्षणिक वर्षात शेतकऱ्यांच्या मुलांचे शुल्क माफ करावे. वीज पडून तसेच पुरात वाहून मृत्यू झाल्यास कुटुंबाला १० लाकांची मदत द्यावी. बँकांनी होल्ड केलेली शेतकऱ्यांची खाती तात्काळ सुरु करावी, अशा विविध मागण्यांसाठी मंगेश साबळे उपोषणाला बसलेले आहेत. दरम्यान उपोषणाच्या समर्थनार्थ गुरुवारी शासकीय विश्राम गृहात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. यात आज शुक्रवारी (दि. ३) तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तरी देखील दखल न घेतल्यास शनिवारी रास्ता रोको आंदोलन, तर रविवारी शहर बंदची हाक देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा. राहुलकुमार ताठे यांनी दिली. दरम्यान आमरण उपोषणाचा चौथा दिवस असताना उपोषणस्थळ तालुक्यातील एकही लोकप्रतिनिध फिरकला नसल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी सुर आहे.