

Sambhajinagar Encroachment Campaign Traders' statement to the administration
फुलंब्री, पुढारी वृत्तसेवा : फुलंब्री शहराचा समावेश छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणात नसतानाही रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली कारण नसताना अतिक्रमण हटविण्याच्या नोटीस दिल्या जात आहेत. दोन वेळेस मोजमाप केले, मार्किंग करून ठेवल्याने व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. फुलंब्रीसाठी मंजूर असलेला वळण रस्ता केला तर दुकानांना बाधा येणार नाही यासह अनेक उपाय व्यावसायिकांनी प्रशासनाला सुचविले आहेत. या प्रश्नावर व्यापाऱ्यांनी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, गेल्या पाच-सात वर्षांत या दुकांनाची दोन वेळेस पडझड झाली आहे. आता तिसऱ्यांदा ही पडझडीच्या नोटीस बजावल्या आहेत. सध्याच्याा मोजणी तील मार्किंग नुसार शहरातील मुख्य बाजार पेठेतील एकही दुकान दिसणार नाही अशी स्थिती असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यासाठी व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन अनेक मुद्दे समोर आनले.
फुलंब्री साठी वळण रस्ता मंजूर आहे, या रस्त्याचे काम सुरु केले तर येथील रुंदीकरणाचा प्रश्न येत नाही या वळण रस्त्याची तीन वेळेस पाहणी व मोजणी झालेली आहे . याचा अंदाजीत खर्च देखील काढला गेला आहे मात्र प्रत्यक्षात ते काम न करता शहरातून रस्ता घेण्याचा हा विनाकारणचा अट्टहास संबंधीत कार्यलय करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. हाच वळण रस्ता तात्काळ करावा अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
निवेदन विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सा.बां. वी.व, राष्ट्रीय महामार्ग कार्यालय यांना देण्यात आले या निवेदनावर व्यापारी बचाव एकता समितीचे सदाशिव तावडे, कैतिकराव भोपळे, सुधाकर ठोबरे, सय्यद रज्जाक हापिस, इरफान पठाण, मोबिन पाशा, राजेंद्र साहुजी, संजय गांधी, वहीद पठाण यांच्यासह शहरातील अनेक व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तळमजल्यावरील पार्किंग खुली करा
रस्त्यावर आडथळे होत असलेले दुकानासमोरील पत्र्याचे शेड, हातगाड्या हे व्यापारी काढत आहेत. रस्त्यावर अवैध पध्दतीने उभी राहणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई करावी, नगरपंचायतीच्या तळ मजल्यातील पार्किंग खुली केली तर कुठलीच अडचण येणार नाही. असे झाले तर व्यापाऱ्यांचे नुकसान न होता मुख्य बाजार पेठ कायम राहील असे अनेक उपाय व्यापाऱ्यांनी सुचविले आहेत.