

Sambhajinagar Encroachment Campaign Comprising about 650 properties
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने शहरातील जालना रोड, पैठण रोड आणि पडेगाव रस्त्यावरील सुमारे चार हज-ारपेक्षा अधिक अनधिकृत मालमत्ता जमीनदोस्त केल्या असून, सोमवारी (दि.७) हर्सल टी पॉइंट ते सिडको बसस्थानक आणि हर्सल टी पॉइंट ते दिल्लीगेट रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. या ठिकाणी मार्किंग करण्यात आली असून, सुमारे साडेसहाशेपेक्षा अधिक अतिक्रमण असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर महापालिकेकडून २० जूनपासून हातोडा चालवण्यात येत आहे. यात आतापर्यंत जालना रोडवरील केम्ब्रिज चौक ते एपीआय कॉर्नर, बीड बायपास, रेल्वेस्टेशन रोडसह पैठण रोडवरील अतिक्रमण मनपाने पाडले.
त्यानंतर आज सोमवारी हर्सल टी पॉइंट ते सिडको बसस्थानक आणि हर्मूल टी पॉइंट ते दिल्लीगेट रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. त्यानंतर एपीआय कॉर्नर ते बाबा पेट्रोल पंपापर्यंतच्या अतिक्रमणावर कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत असून, सेव्हनहिल ते एपीआय कॉर्नरपर्यंतच्या अतिक्रमण आणि सर्व्हिस रोडची मार्किंग केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तसेच केम्ब्रिज चौक ते सेव्हनहिल उड्डाणपुलापर्यंत हा रस्ता ६० मीटरचा असून, पुढे बाबापर्यंत ४५ मीटरचा असणार आहे. या ४५ मीटर रस्त्यावरच वाहनधारकांना सर्वाधिक वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने हा रस्ताही ६० मीटर करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.