

Sambhajinagar Crime News: Brutally beaten on suspicion of theft
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रेल्वे स्टेशन एमआयडीसीतील हमालवाडा येथील मराठवाडा स्पन पाईप कंपनीत १८ फेब्रुवारीला एक अनोळखी मृतदेह आढळला होता. अधिक तपासात कंपनीतील वॉचमनसह चौघांनी वायर चोरीच्या संशयातून बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या प्रकरणात शुक्रवारी (दि.२७) वॉचमनसह चौघांविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.
ऋषिकेश बबन वक्ते (२५), रोहित संतोष नगराळे (१९), चंद्रकांत भाऊसाहेब मारकळ (२१) आणि राहुल बाबूराव दुतोंडे (२४, सर्व रा. खंडोबा मंदिराजवळ, सातारा), अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.
हमालवाडा येथील मराठवाडा स्पन पाईप कंपनीत १८ फेब्रुवारीला दुपारी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला होता. त्याला घाटीत दाखल केले असता, शवविच्छेदनात शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या जखमा असल्याची माहिती समोर आली. त्यावरून हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट होताच सहायक पोलिस निरीक्षक शैलेश देशमुख यांच्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मराठवाडा स्पन पाईप कंपनी बंद अवस्थेत आहे. मात्र, तेथे वायर चोरीच्या घटना वाढल्यामुळे राहुल दुतोंडे याला वॉचमन म्हणून ठेवले होते. पोलिसांनी दुतोंडेची चौकशी केल्यानंतर या खुनाला वाचा फुटली. तो वॉचमन म्हणून कर्तव्यावर असताना मृत तेथे वायर चोरी करण्यासाठी आला होता. हा प्रकार दुतोंडेला दिसला. त्याने त्याच्या इतर साथीदार ऋषिकेश वक्ते, रोहित नगराळे, चंद्रकांत मारकळ या तिघांना बोलावून घेतले. चौघांनी मिळून बेदम मारहाण केल्याने चोरी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
मृताची ओळख पटेना
या प्रकरणात चारही आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलिस सोमवार पर्यंत कोठडी सुनावली आहे. मात्र, अद्याप मृताची ओळख पटलेली नाही. मृताची ओळख पटविण्याचे काम पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, सहायक निरीक्षक शैलेश देशमुख, उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले, अंमलदार सुनील पवार, सुनील बेलकर, संदीप चिंचोले, कल्याण निकम, दिगंबर राठोड, काळे, पाचे हे करीत आहेत.