

Sambhajinagar Central team's surprise visit to Waluj Cluster work Inspection
वाळूज, पुढारी वृत्तसेवा : शामप्रसाद मुखर्जी रूरबन मिशनअंतर्गत येत असलेल्या केंद्रीय समितीने शनिवारी (दि.१२) वाळूजसह जोगेश्वरी येथे भेट देऊन कामाची पाहणी केली. सन २०१८ ते २०२१ अंतर्गत मंजूर झालेली कामे, अपूर्ण कामकाज आदींची माहिती घेत अपूर्ण कामाबाबत असमाधान व्यक्त केले. समिती हा अहवाल लवकरच शासनाला पाठविण्यात येणार आहे. अहवालात अखेर काय आहे, अशी चर्चा वाळूजसह परिसरात सुरू आहे.
जोगेश्वरी क्लस्टर या योजनेतून वाळूजसह जोगेश्वरी गावांना शासनाने विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यात वाळूज येथे अभ्यासकीय केंद्र, जि. प. प्रशालेत प्रशस्त सभाग्रह, घनकचराची विल्हेवाट, वाळूज ते कासोडा रोड दुरुस्तीसह सिमेंटीकरण, तर जोगेश्वरी येथेही अनेक कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता.
त्यात वाळूजच्या आठवडी बाज-ाराचे सुशोभीकरणाचाही समावेश होता. विशेष म्हणजे या कामाचे आ. प्रशांत बंब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. मात्र बाजाराचे सुशोभीकरण झालेच नाही. प्रशालेतील सभागृह, अभ्यासिका केंद्राचे कामही अपूर्णच आहे.
सदरच्या कामांची तपासणी करण्यासाठी शनिवारी अचानक केंद्रीय समितीचे पथक वाळूज गावात येऊन गेले. यावेळी पथकाने डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी रुरबन मिशन अंतर्गत मंजूर झालेले व आजपर्यंत अपूर्ण कामांची माहिती सबंधिताकडून घेतली. पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजनेसह बचत गटाच्या आर्थिक व्यवहाराची माहिती घेतली. अपूर्ण कामे, चुकीचे कामे, अर्धवट कामे आदींविषयी समितीने सखोल चौकशी करून पाहणी केली आहे. बचतगटांच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी केली.
या पथकात अभियान जिल्हा व्यवस्थापक विक्रम सरगर, सहाय्यक लेखा परीक्षक शांतीदास मुकोध्याय, एस.बी. शर्मा, लेखाधिकारी यशवंत शिंदे आदींचा समावेश होता. यावेळी सरपंच सईदा पठाण, उपसरपंच योगेश आरगडे, ग्रामपंचायत अधिकारी उत्तम भोंडवे, ग्रा. पं. सदस्य पोपट बनकर, युसूफ कुरेशी, गटविकास अधिकारी वाकचौरे, विस्तार अधिकारी अशोक घोडके, विलास झाल्टे, कृष्णा साळवे, रमा सुरडकर, वनमाला गोसावी, कन्याकुमारी चामे, हेमलता सोमवंशी, ज्योती गायकवाड, ताजू मुल्ला, रोहित श्रीमाळी, देवचंद भुजंग, अख्तर शेख, पांडुरंग आगळे, अमोल बनकर आदी उपस्थित होते.