

The health of a farmer deteriorated who left for Mumbai with a plow on his shoulder
गोरख भुसाळे
किनगाव: शेतकरी सन्मानाने जगला पाहिजे यासाठी सरकारने कर्जमाफी द्यावी यासह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या घेऊन ४ जुलै रोजी खांद्यावर नांगर घेऊन अनवाणी पायी चालत विधानभवनाकडे निघालेले अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी सहदेव होनाळे अखेर ११ व्या दिवशी रविवारी (दि. १३) ठाण्यात पोहोचले आहेत. अहमदपूर ते मुंबई हे १५०० किमीचे अंतर पायाला दुखापत झाल्याने व शुगर बाढल्याने चक्कर येऊन त्यांची तब्येत बिघडल्याने सहदेव होनाळे यांना तेथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांना जगण्याचा अधिकार मिळावा, रोजगार हमी योजना वर्ष २०२३ पासूनची थकीत रक्कम मिळावी, नाफेड अंतर्गत ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यांना खरेदी फरक रक्कम मिळावी, शेतकरी सन्मान निधीत वाढ करावी अशा अनेक मागण्या घेऊन शेतकरी सहदेव होनाळे हे विधानभवनाच्या दिसेने खांद्यावर नांगर घेऊन पायी चालत निघाले आहेत. अहमदपूरमधून निघाल्यानंतर त्यांनी दिवसाला ५० किलोमीटर अंतर चालण्याचे ध्येय ठेवले होते. सुरुवातीला काही किलोमीटर अंतर ते एकटेच चालत होते. नंतर त्यांना त्यांच्या मित्राने साथ दिली आणि तो मित्र गणेश सूर्यवंशीसुद्धा पायी चालत निघाले.
दोघांनी ११ व्या दिवशी मुंबई गाठली. ५०० किलोमिटर अंतर चालताना वाटेत अनेक अडचणी त्यांना आल्या. अनेक शेतकऱ्यांनी वाटेत जेवणाची आणि झोपण्याची व्यवस्था केली तर काही ठिकाणी शेतकरी काही अंतर चालायला सोबत आले होते. दरम्यान, रविवारी त्यांनी ठाणे गाठले.
मात्र पायाला झालेली दुखापत आणि वाढलेली शुगर आणि त्यांना चक्कर येत असल्याने ठाण्यातील हॉस्पीटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झाले. त्यांच्यावर तिथे उपचार रविवारी सुरू होते. उपचार घेऊन परत पायी चालत सोमवारी ते विधानभवनाकडे कूच करणार आहेत.
शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असून शेतकरी सन्मानाने जगला पाहिजे यासाठी सहदेव होनाळे हे शेतकरी यांच्या मागण्या घेऊन विधानभवनाकडे खांद्यावर नांगर घेऊन पायी निघाले आहेत. त्यांच्या मागणीला त्यांच्या गावाने पाठिंबा दिला आहे. ग्रामसभेत तसा ठराव घेतला असून, सहदेव होनाळे यांच्या मागण्यांची दखल घेण्याची मागणी धानोरा ग्रामपंचायतीने केली आहे. त्याबाबतचे निवेदन शेतकऱ्यांनी अहमदपूर येथे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.