

Sambhajinagar BJP workers oppose new entry
अमित मोरे
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडे प्रत्येक प्रभागात १५ ते २० इच्छुक आहेत. मात्र, असे असतानाही पक्षात पुन्हा नव्यांना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे जुन्या इच्छुकांकडून या प्रवेशांना विरोधाला केला जात असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात पुन्हा जुने-नवे असा वाद उफळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच शहर भाजपकडूनच आता नव्या प्रवेशांना ब्रेक लावण्यात आल्याची चर्चा आहे.
महापालिकेच्या अगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर विविध पक्षांतून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यात सर्वाधिक प्रवेश हे भाजपमध्येच सुरू आहे. प्रवेश करणारे प्रत्येक जण हे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आहेत. तर काही नेते हे इतर पदांसाठी प्रवेश करीत आहेत. परंतु, या नव्या प्रवेशामुळे पक्षातील जुन्या निष्ठावंतांमध्ये नाराजीचे पसरली आहे. पक्षात अगोदरच एका प्रभागातील एकाएका जागेसाठी १५ ते २० इच्छुक उमेदवार असताना नव्यांना प्रवेश का, असा सवाल जुने पदाधिकारी नेत्यांकडे उपस्थित करीत आहेत.
पक्षात नवे स्पर्धक निर्माण होत असल्याने आता भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी नव्या प्रवेशांना विरोध करणे सुरू केले आहे. यातूनच राजू शिंदे यांनादेखील असा विरोध काही पदाधिकाऱ्यांनी केला होता. आता शिंदे सेनेतून भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत असलेले जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना देखील असाच विरोध करण्यात आला. त्यामुळे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी सर्व जुन्या कार्यकर्त्यासह इच्छुकांचा विचार करून नव्या प्रवेशांना ब्रेक लावल्याची चर्चा आहे. त्यात शिंदे गटातून येणाऱ्यांना तूर्तास भाजपमध्ये नो एन्ट्री असल्याचीही चर्चा आहे.
सर्वाधिक इच्छुक भाजपकडेच
महापालिकेच्या अगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी इतर सर्व पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक इच्छुक हे भाजपकडेच आहेत. प्रभागातील एका जागेसाठी सुमारे २० इच्छुक आहेत. या इच्छुकांतूनच उमेदवार निवडताना नेत्यांची दमछाक होणार असून निवडीवेळी वादही होण्याची शक्यता आहे.