

Ajanta Veterinary Clinic Protest
अजिंठा : अजिंठ्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी अधिकारी नसल्याचा फटका पशुपालकांना बसत असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी (दि. २६) दवाखाना बंद पाडला. उपचाराअभावी गाभण म्हैस दगावल्याचा आरोप शेतकरी शेख चांद शेख जलील यांनी केला आहे. या घटनेनंतर अजिंठ्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करण्याची मागणी जोर धरली आहे.
शेख चांद यांच्या गाभण म्हशीला शुक्रवारी (दि. २५) सायंकाळपासून प्रसूतीपूर्व त्रास सुरू झाला होता. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी आणि दवाखान्यातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. रात्री म्हशीने मृत वासराला जन्म दिल्यानंतरही तिच्या वेदना सुरूच होत्या. उपचारासाठी वैद्यकीय मदत न मिळाल्याने शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास म्हशीचा मृत्यू झाल्याचा आरोप शेख चांद यांनी केला.
शेख चांद यांनी अवघ्या आठ दिवसांपूर्वी ही गाभण म्हैस १ लाख ४० हजार रुपयांना खरेदी केली होती. त्यापैकी ४० हजार रुपये दिले असून, उर्वरित एक लाख रुपये शेतातील पीक निघाल्यानंतर देण्याचे ठरले होते. त्यामुळे म्हशीच्या मृत्यूमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
म्हशीची प्रकृती गंभीर झाल्यानंतर शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास शेख चांद पशुवैद्यकीय दवाखान्यात गेले. मात्र, तेथे अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अखेर उपचाराअभावी सकाळी दहाच्या सुमारास म्हशीचा मृत्यू झाला.
म्हशीच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या शेख चांद यांनी दवाखान्यात जाऊन जाब विचारला. डॉक्टरच उपलब्ध नसतील तर दवाखाना सुरू ठेवण्याचा उपयोग काय, असा सवाल करत त्यांनी कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी दवाखाना बंद पाडला.
अजिंठा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे पद मागील दीड वर्षांपासून कायमस्वरूपी रिक्त असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या पालोद येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे अजिंठ्याचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे. मात्र, प्रभारी अधिकारी नियमित उपलब्ध नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत पशुपालकांना उपचारासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, यापूर्वी १ वर्षापूर्वी दै. ‘पुढारी’ने ‘अजिंठ्यात पशुवैद्यकीय अधिकारी पदभार स्वीकारेना’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी चंद्रकांत मात्रे यांच्याकडे अजिंठ्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्यांनी सुमारे सहा ते सात महिने कारभार पाहिल्यानंतर पुन्हा हा पदभार वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला.
अजिंठ्यातील पशुवैद्यकीय दवाखाना प्रभारी व्यवस्थेवर चालविण्याऐवजी येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पशुधनाच्या आपत्कालीन उपचारांसाठी नियमित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून न दिल्यास दवाखाना सुरू करू देणार नाही, असा इशाराही संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.