

Saint Eknath and Savta Maharaj's meeting at Aran
चंद्रकांत अंबिलवादे
पैठण : श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी आषाढीवारी निमित्त पांडुरंगाची भेट घेण्यासाठी मार्गस्थ होत असलेल्या पालखी मार्गावरील संत मालिकातील थोर संत श्री सावता महाराज यांचे संजीवनी समाधीस्थळ अरण, (ता. माढा जिल्हा सोलापूर) येथील सावता महाराजांचे मळ्यात नाथाच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचा पंधरावा मुक्काम या पवित्र भूमीत वारकरी हरिनामाचा गजर करीत दाखल झाला.
यावेळी पालखी सोहळ्यातील परंपरेप्रमाणे श्रीसंत एकनाथ महाराज व संत श्रीसावता महाराज यांची संतभेट सोहळा भानुदास एकनाथ यांच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पालखी सोहळाप्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी नाथांचा पालखी सोहळा अरण पंचक्रोशीत दाखल होताच परिसरातील भाविकांच्या वतीने नाथांच्या पादुका व पालखीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.
पालखी मार्गावर रांगोळी काढून वाजतगाजत पादुकाची मिरवणूक काढण्यात आली. गावातील भाविकांच्या दर्शनासाठी नाथांच्या पादुका पालखी संत श्रीसावता महाराज यांच्या मंदिरात विसाव्यासाठी ठेवण्यात आली.
यावेळी दर्शन घेण्यासाठी भाविकांना एकच गर्दी केली होती. संत सावता महाराज यांच्यामंदिर परिसरात व भक्तनिवासात वारकऱ्यांची मुक्कामाची व्यवस्था करण्यात येऊन आलेल्या वारकऱ्यांना भोजन व्यवस्था करण्यात आली होती.