Ahilyabai Holkar Scheme : अहिल्याबाई होळकर योजनेत ६ हजार १८९ मुलींना लाभ
6 thousand 189 girls benefit from Ahilyabai Holkar scheme
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांची पास काढण्यासाठी होणारी धावपळ थांबवण्यासाठी एसटी महामंडळ शाळेत जाऊन पास वितरित करत आहे. त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केला आहे. शाळा सुरू होताच अहिल्याबाई होळकर योजनेत ६ हजार १८९ विद्यार्थिनींना तर ३ हजार ६७५ विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन पास वितरित केल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली.
ग्रामीण भागांत शाळेत जाण्यासाठी बस हे प्रमुख साधन आहे. विद्यार्थ्यांसाठी बसकडून सवलतीच्या दरात मासिक पास उपलब्ध करून देतात. पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांना बरीच पायपीट करावी लागते. याला कंटाळून अनेक विद्यार्थी पास काढत नाहीत.
तर काही जणांना ते शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन आता एसटीचे कर्मचारी प्रत्येक शाळेत जाऊन पास काढण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची यादी बनवून त्यांना शाळेतच पास पोहोचते करत आहे. १७ जूनला शाळा नियमित सुरु झाल्या. ३० जूनपर्यंत ३ हजार ६७५ विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन पास वितरित केले आहेत.
६ हजार १८९ अहिल्याबाई होळकर योजनेचे पास
ग्रामीण भागात माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी जवळपासच्या गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. दळणवळ -णाची सुविधा असूनही केवळ आर्थिक स्थिती चांगली नसल्याने अनेक विद्यार्थिनींना शिक्षणापासून वंचित रहावे लागत होते.
यामुळे शिक्षण घेणाऱ्या मुलींचे प्रमाण घटत चालले आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी एसटी महामंडळाने शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना राबवली. या योजनेंतर्गत ३० जून पर्यंत ६ हजार १८९ विद्यार्थिनींना या पासचा लाभ देण्यात आल्याची माहिती घाणे यांनी दिली.

