

Rs 8.5 crores recovered in a single day in Shasti Se Azadi campaign
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने सुरू केलेली शास्ती से आजादी ही मोहीम चांगलीच फळाला असून या मोहिमेंतर्गत आतापर्यंत १३० कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. तर बुधवारी (दि.१३) या एकाच दिवसात तब्बल ८ कोटी ६५ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला असून १७ लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल झाली आहे. आजपर्यंतची ही सर्वाधिक वसुली असून यापूर्वी ७ कोटी २० लाख रुपयांची वसुली ३१ मार्च २०२४ रोजी झाली होती.
महापालिकेकडून थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी शास्ती से आजादी ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. १५ जुलैपासून सुरू झालेली ही मोहीम १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या योजनेत थकीत दंडावर ९५ टक्के सवलत दिली जात आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून थकबाकी असलेले नागरिकही कर भरण्यास पुढे येत आहेत.
शहरात सुमारे सव्वातीन लाख मालमत्ताधारकांकडे एकूण ८१९ कोटी रुपयांची थकबाकी असून त्यापैकी २२९ कोटी रुपये हे निव्वळ शास्तीचे आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत १० कोटी रुपयांपेक्षा अधिकची दंडमाफी देण्यात आली आहे. या योजनेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे वसुली कार्यालये रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत.
यात सोमवारी ५ कोटी, मंगळवारी ६ कोटी तर आज बुधवारी साडे आठ कोटी रुपये वसूल झाले असल्याचे उपायुक्त व कर मूल्यनिर्धारक विकास नवाळे यांनी सांगितले. तसेच उर्वरित दिवसांत अधिकाधिक नागरिकांनी ही संधी साधून थकीत कराची रक्कम भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवाळे यांनी केले आहे.