

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने तिकीट तपासणी मोहिमेत विशेष कामगिरी केली असून, मागील ९ महिन्यांत तब्बल ११ कोटी ६ लाखांची विक्रमी महसुलाची वसुली केली आहे. निर्धारित उद्दिष्ट ओलांडणारा नांदेड विभाग हा एकमेव ठरला आहे.
रेल्वेच्या नांदेड विभागाने एप्रिल ते डिसेंबर-२०२५ या ९ महिन्यांच्या कालावधीत तिकीट तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत तब्बल ११.६ कोटींचा महसूल मिळवला. ही कामगिरी मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत २०.२३ टक्क्यांनी अधिक असून, निर्धारित उद्दिष्ट ओलांडणारा नांदेड विभाग हा एकमेव विभाग ठरला आहे. तिकीटविरहित प्रवास रोखण्यासाठी एकाच विभागात संपूर्ण स्थानके व गाड्यांचा समावेश असलेल्या ११४ फोर्टेस चेक मोहिमा राबविण्यात आल्या. याशिवाय, मोठ्या पथकांच्या सहभागातून १७ मॅसिव्ह चेक मोहिमा घेण्यात आल्या.
अनेक ठिकाणी अचानक तपासणी
या पथकाने संवेदनशील ठिकाणी अचानक तपासणीसाठी ११ स्पॉट चेक पथके नेमण्यात आली होती. तसेच अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी दरमहा एक तपासणी असा कार्यक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे १७ ऑक्टोबर-२०२५ रोजी एका दिवसात सर्वाधिक कामगिरी नोंदविण्यात आली असून, या दिवशी १,५८१ प्रकरणे उघडकीस आणत १०,९०,१३९ इतकी रक्कम वसूल करण्यात आली. तसेच ऑक्टोबरच्या पूर्ण महिन्यात २६, २६६ प्रकरणे नोंदवून १ कोटी ५५ लाख २१ हजार ८३५ इतकी विक्रमी वसुली करण्यात आली.
३३ पथकांनी केली कारवाई
या कारवायांसाठी ३३ तिकीट तपासणी पथक कर्मचारी, १७विभागीय कार्यालयातील कर्मचारी व १७१ यात्री सुविधा कर्मचारी आदींचा समावेश होता. ही मोहीम विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले, डॉ. विजय कृष्णा, बी. रितेश आणि शैलेश कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली.