

Rs 1 Lakh in Cash Stolen from Car in Gangapur
गंगापूर : पुढारी वृत्तसेवा गंगापूर शहरात दिवसाढवळ्या निर्भय चोरट्यांचा धुमाकूळ पहायला मिळत असून, भरदुपारी उभी असलेल्या कारमधून तब्बल १ लाख रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केल्याची थरारक घटना शुक्रवारी घडली. विशेष म्हणजे ही चोरी अगदी काही मिनिटांतच घडल्याने शहरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिवाजी कारभारी शिंदे (वय ३८, रा. गुरुधानोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २७ मार्च रोजी दुपारी १.२० ते १.३० च्या सुमारास त्यांनी मित्राची हुंदाई कंपनीची क्रेटा कार अप्सरा जनरल स्टोअर्ससमोर उभी केली.
लवकर परत जायचे असल्याने कार लॉक न करता शिंदे पेनचा बॉक्स आणण्यासाठी काही क्षणांसाठी दुकानात गेले असता, अज्ञात चोरट्याने कारचे दार उघडून थेट गिअर-जवळील कप्प्यातील १ लाखाची रोकड उचलली आणि क्षणात पसार झाले. घटना लक्षात आल्यानंतर शोधाशोध करूनही पैसे न मिळाल्याने शिंदे यांनी सायंकाळी उशिरा पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस अंमलदार अमित पाटील करीत आहेत. चार चाकी वाहन लॉक न करता सोडणे आता धोकादायक ठरत असून, नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.