

Recruitment process for 141 professors on consolidated pay begins today
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १४१ प्राध्यापकांची एकत्रित वेतनावर भरती करण्यात येणार आहे. यासाठी ४६८ उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले असून, ३ व ४ ऑगस्ट रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.
विद्यापीठात एकत्रित निधीतून वेतनावर विविध ५६ विभागात शिक्षकांची १४१ पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांची लेखी परीक्षा. मुलाखतीद्वारे ही पदे भरण्यात येणार आहेत. विद्यापीठात शिक्षक प्रवर्गातील २८९ शासन मान्य पदे असून १६० पदे सध्या रिक्त आहेत. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक प्रवर्गातील ७३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तथापि, रिक्त पदांची संख्या मोठी असल्याने एकत्रित वेतनावरी पदे भरण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी एकत्रित वेतनावर सहायक प्राध्यापकांची १४१ पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील ३० विभाग, धाराशिव उपपरिसर येथील ७ विभाग व दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्र अशा ३८ विभागांत ५६ जागांसाठी १४१ पदे भरण्यात येणार आहेत.
दोन दिवस लेखी परीक्षा
विद्यापीठाच्या मुख्य परिसर व धाराशिव उपपरिसरातील ३७ विभागातील ५६ विषयांसाठी १४१ प्राध्यापकांची पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र व ज्ञान स्त्रोत केंद्र या तीन ठिकाणी ३ व ४ ऑगस्ट रोजी सात सत्रांत संगणकावर लेखी परीक्षा घेण्यात येईल. या दोन दिवसांत एकूण ४६८ उमेदवार ही पात्रता चाचणी देणार आहेत.