

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
पेशंट तपासण्याच्या बहाण्याने आयुर्वेदिक उपचार करणाऱ्या डॉक्टरला घरून बोलावून घेत चौघांनी डॉक्टरला बेडरूममध्ये कोंडले. एका महिलेने त्यांच्या शर्ट, पॅन्टचे बटन तोडून आरडाओरड केली. त्यानंतर एकाने दार उघडून दोघांचा व्हिडिओ काढला. त्यानंतर पाच लाखांची मागणी करून ८६ हजार रुपये उकळले. हा प्रकार बुधवारी (दि. २८) सकाळी साडेअकरा ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान हसूल भागात घडला.
सांडू लहाने, शकुंतला सांडू लहाने, स्वप्नील लहाने आणि शकुंतलाची मुलगी आणि जावई अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी सांडू लहाने याला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी डॉ. दीपक दिनकर वानखेडे (५०, रा. लोणी बोडखा, ता. खुलताबाद) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना बुधवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास आरोपी शकुंतलाने फोन करून घरी पेशंट असून, त्याला चालता येत नाही. तुम्ही आयुर्वेदिक औषधोपचार करण्यासाठी घरी या, अशी विनंती केली. दुसऱ्यांदा फोन करून जाण्या-येण्याचा खर्चही देऊ, असे म्हटल्याने डॉ. वानखेडे हे दुचाकीने त्यांच्या सहकारी रोहिणीसोबत हसूल येथे गेले.
हरसिद्धी माता मंदिरामागे एका झाडाखाली रोहिणीला उभे करून वानखेडे लहानेच्या घरी गेले. सांडू लहानेने पेशंट बेडरूममध्ये आहे, असे म्हणून त्यांना आत नेले. बेडरूमचे दार बाहेरून लावून घेतले. शंकुतला आत होती. तिने डॉक्टरसोबत झटपट केली. तुम्ही असे काय करताय, असे वानखेडे म्हणत असताना तिने वानखेडे यांच्या शर्ट-पॅन्टचे बटन तोडून पतीला आवाज दिला. सांडू याने दार उघडून आत येत दोघांचा मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवू लागला. तुम्ही व्हिडिओ बनवू नका, असे वानखेडे हातपाय पडून विनवणी करू लागले. त्यानंतर लहानेचा मुलगा, मुलगी आणि जावई आले. त्यांनी शिवीगाळ केली. शकुंतलाने खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. पाच लाख दे नाही तर व्हिडिओ व्हायरल करेल, असे धमकावले. डॉ. वानखेडे प्रचंड घाबरले.
डॉ. वानखेडे यांनी बियाणे खरेदी करण्यासाठी सोबत आणलेले ७८ हजार रुपये आरोपींनी काढून घेतले. त्यानंतर आणखी पैशाची मागणी केली. मित्राकडून सहा हजार मागवून त्यांनी शंकुतलाने दिलेल्या नंबरवर फोन पे केले. त्यानंतर उद्यापर्यंत उर्वरित पैसे दिले नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवे मारू, अशी धमकी दिली. याप्रकरणी हसूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक गणेश केदार करत आहेत.