

Revoke the decision to relocate the Tehsil office; otherwise, a public agitation will follow
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड शहराच्या मध्यवस्तीत बसस्थानक व पंचायत समितीशेजारी असलेले तहसील कार्यालय अन्यत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सिल्लोड तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय नायब तहसीलदार संतोष परदेशी यांना निवेदन देऊन देण्यात आला आहे. यासंदर्भात तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात येणार आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तहसील कार्यालय हे तालुक्यातील ग्रामीण भागातून येणारे शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत सोयीच्या ठिकाणी आहे. महसूल विभागाच्या विविध कामांसाठी नागरिकांना वारंवार तहसील कार्यालयात यावे लागते. त्यामुळे कार्यालय दूरस्थ ठिकाणी हलविल्यास नागरिकांवर आर्थिक व मानसिक भार पडणार असून प्रशासन लोकाभिमुख राहणार नाही.
निवेदनावेळी तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, जिल्हा उपप्रमुख रघुनाथ चव्हाण, संजय कळात्रे, शहर प्रमुख मच्छिंद्र घाडगे, प्रसिद्धीप्रमुख दशरथ सुरडकर, पत्रकार प्रकाश वराडे, उपतालुकाप्रमुख रामेश्वर काळे, ज्येष्ठ पदाधिकारी संजय कळात्रे, महेंद्र बावस्कर, युवासेना शहर पदाधिकारी रामेश्वर ऐंडोले, सोमनाथ बडक, विठ्ठल खिल्लारे, विभागप्रमुख गजानन जयस्वाल, सखाराम हिवाळे, बाबुराव खंबाट, पंकज कांबळे, सुनील सोनवणे, प्रवीण पंडित इंगळे, मिलिंद देहाडे, संजय बी. आरके, तुकाराम खळतकर, सीताराम शिंदे, गजानन कळूबा जाधव, लक्ष्मण जाधव, समाधान जाधव, सचिन साळवे, पंढरीनाथ म्हसके आदी शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
शासकीय मालमत्तेचा प्रभावी वापर
शासनाने नव्याने उभारलेल्या इमारतीत रजिस्ट्री कार्यालय, कृषी विभाग, वन विभाग तसेच सध्या भाडेतत्त्वावर सुरू असलेली इतर शासकीय कार्यालये स्थलांतरित करावीत. त्यामुळे शासनाचा भाडेखर्च वाचून शासकीय मालमत्तेचाही प्रभावी वापर होईल, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. नागरिकांच्या भावना डावलून तहसील कार्यालयाच्या स्थलांतराचा निर्णय कायम ठेवल्यास धरणे, मोर्चे व व्यापक लोकसहभागातून तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.