

Returning rains wreak havoc in Chhatrapati Sabhajinagar taluka
चित्तेपिंपळगाव, पुढारी वृत्तसेवा तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. सततच्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील मुख्य पीक असलेले कापूस पूर्णपणे वाया गेले असून, तूर आणि मका पिकांनाही मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून पिके कुजली आहेत, तर काही ठिकाणी शेतमाल वाहून गेला आहे.
या वर्षी चांगल्या पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात खरीप हंगाम सुरू केला होता. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस, तूर आणि मका या पिकांची लागवड केली होती. मात्र, परतीच्या पावसाने सगळी मेहनत पाण्यात गेली आहे. कापसाच्या बोंडांवर कीड लागल्याने उत्पादनात मोठी घट झाली असून, तूर व मका शेंगांना सड लागल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांत छत्रपती संभाजीनगर, तालुक्यातील, चित्तेपिपंळगाव, गारखे गारखेडा प्रिंत्रिराजा डायगव्हान सांजखेडा, पांढरी पिंपळगाव, लायगाव खोडेगाव, काद्राबाद कचनेर, निपाणी, आडगाव, भालगाव, एकोड पाचोड, आपतगाव, झाल्टा, टाकळी, शेंद्रा, कुंभेफळ या परिसरात सलग पाऊस कोसळत आहे. अनेक नाल्यांना पूर आला असून, शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी सांगितले की, "पावसामुळे आमचे संपूर्ण पीक नष्ट झाले आहे. कर्ज कसे फेडायचे आणि पुढचा हंगाम कसा सुरू करायचा हेच समजत नाही. कृषी विभागाकडून पिकांच्या नुकसानीचा शासनाने मदत द्यावी.
दरम्यान, सततच्या पावसामुळे कपाशीच्या बोंडातून आता कोंब बाहेर येऊ लागले आहेत. शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीची दखल घेऊन शासनाने तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश शिंद यांनी केली आहे. प्राथमिक पंचनामे सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.