

पैठण : यंदा मुबलक झालेल्या पावसामुळे आणि ढगाळ वातारणामुळे गायब झालेली थंडी परतल्याने रब्बीतील पिकांना याचा चांगलाच लाभ होत आहे. पैठण तालुक्यात ज्वारीचे पिके बहरली असून निसावलेल्या कणसामध्ये दाणे भरण्यास सुरुवात होऊ लागली आहे.
थंडी व पोषक वातावरणामुळे यंदा ज्वारीच्या उत्पादनात भरमसाठ वाढ होण्याची आशा आहे. ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असणाऱ्या पाचोड भागातील ज्वारीची चव सर्वदूर लोकप्रिय आहे.सध्या ज्वारीचे पीक जोमात आले आहे. .केवळ अन्नधान्याचा नव्हे तर गुरांच्या चाराऱ्याचाही प्रश्न काहीअंशी मार्गी लागणार आहे.
पैठण तालुक्यात खरिपात कापूस, तूर जास्त प्रमाणात घेतले जाते.त्याच प्रमाणे रब्बी हंगामातही ज्वारीचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. गेल्या काही वर्षांत कापसाकडे असलेला शेतकऱ्यांचा कल लक्षात घेता ज्वारीचे क्षेत्र कमीच झाले होते. कोरडवाहू शेतकरी मूग, उडीद, सोयाबीन या पिकानंतर ज्वारी पेरतात. कोरडवाहू शेतकऱ्यांना ही दोन्ही पिके दिलासा देणारीच आहेत. यंदा ज्वारीचा पेरा गतवर्षीच्या तुलनेत वाढला. डिसेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाने आणि योग्य वेळी वाढलेली थंडी यामुळे ज्वारीची कणसे आता भरात आली आहेत. काही ठिकाणी पोटऱ्यात आलेली ज्वारी लहरताना दिसत आहे.
पिकाची खासियत
पैठण तालुक्यातील पाचोडसह कोळी बोडखा,थेरगाव, हर्षी, दावरवाडी, नांदर,सोनवाडी, कुतुबखेडा, मुरमा, तसेच लगत असलेल्या माळीवाडी, भोकरवाडी आदी.भागातील जमीन काळी कसदार आहे.ज्वारीचे उत्पादन काढण्यासाठी पोषक असल्याने या भागातील ज्वारीची खासीयत वेगळी आहे. शिवाय हुरड्यासाठी राखलेली काही कणसे असतात. अद्याप हुरडा खाण्यासाठी आला नसला, तरीही यंदा ज्वारीचा हंगाम चांगला राहील, असे संकेत शिवारात मिळत आहेत.
संकरित ज्वारीने उत्पादन वाढले तरीही ज्वारीच्या जुन्या जाती अजूनही टिकून आहेत. संकरित ज्वारीचे उत्पादन भरघोस असले तरीही खाण्यासाठी मात्र ही ज्वारी कसदार मानली जात नाही. खाण्यासाठी रब्बी म्हणजेच मोठी ज्वारी लाच जास्त पसंती दिली जाते. संकरित ज्वारीचा भावही कमी असतो. खाद्यसंस्कृतीत भाकरी ही तशी सर्वसामान्यांचेच अन्न होती. आता भाकरीची चव बड्या बड्यांना आपलीशी केली आहे. यातूनच ज्वारीची मागणी वाढत आहे.
राखणसाठी तजवीज
यंदा पाऊस चांगला पडल्याने खरीप हंगाम फयदेशीर ठरत आहे. शेतकऱ्यांनी केलेला खर्च पदरात पडू लागला आहे. त्या पाठोपाठ सिंचन क्षेत्र मुबलक असल्याने परिसरात यंदा रब्बी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याचे पहावयास मिळते. त्यात ज्वारीची भरमसाठ झालेली पेरा पाहून यावर्षी ज्वारीच्या उत्पादनात भरमसाठ वाढ होणार असल्याने काही शेतकरी खरिपातील नुकसान रब्बीतून काढण्याचा प्रयत्न करत आहे.
पक्ष्यांच्या थव्यांपासून संभाव्य ज्वारीचे होणारे नुकसान टाळवे यासाठी शेतकरी बांधव विविध उपाययोजनाची तजवीज करत आहे.त्यात पक्षी ज्या झुडपात लपतात त्याचा डहाला करत आहे. पिकाच्या भोवती पक्षी प्रतिबंधक बेगडपट्टी बांधण्यासह सकाळच्या सत्रात पक्षापासून पीक वाचवण्यासाठी गोफणीचा वापर, शेतात मचाण बांधणे आदी कामांचे नियोजन शेतकऱ्यांनी केले.
शेतकऱ्यांना दुहेरी फायदा
कापसावर होत असलेला वारेमाप खर्च आणि बाजारभावात कापसाची होत असलेली घसरण यामुळे यंदा काही प्रमाणात ज्वारीचा पेरा वाढला. गेल्या दोन वर्षापासून ज्वारीचे भाव प्रचंड वाढत असल्याने गव्हाला मागे टाकत ज्वारीने आपले दाणेदार पण सिद्ध करत आहे. ज्यांनी कडबा विकला त्यांना चांगले पैसे आले. ज्वारी आणि कडबा असा दुहेरी फायदा या पिकाने शेतकऱ्यांना दिला.