

Rescue of 10 cows that were kept for slaughter
पैठण, पुढारी वृत्तसेवा :
पैठण तालुक्याच्या बालानगर परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवलेले १० गोवंश जनावरांची एमआयडीसी पोलिस पथकाने छापा मारून सुटका केली आहे.
ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या विविध गावांत गोवंश जनावरांची हत्या रोखण्याची मोहीम राबविण्याचा सूचना दिल्या आहेत.
जगदाळे यांनी पोलिस पथकातील सपोनि शेळके, पोलिस उपनिरीक्षक संभाजी झिंजुर्डे, जमादार दाभाडे, राहटवाड, उगले, पंडित, घाटेश्वर यांच्या मदतीने तपासणी मोहीम राबवली. बालानगर परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे गोवंश जनावरे ठेवल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदरील ठिकाणी पथकाने छापा टाकला. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा केला आहे.
१० गोवंश जनावरांची सुटका करून या सर्वांना गोशाळेत पाठविण्यात आले. आरोपी मुनावर गनी शेख, तसावर गनी शेख (रा. बालानगर, ता. पैठण) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फर्दापूर : जनावरांना क्रूरतेने वागणूक दिल्याच्या प्रकरणात फर्दापूर पोलिसांनी दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करून ३ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.५) पहाटे साडेचारच्या सुमारास फर्दापूर येथील छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील सोयगाव फाटा परिसरात फर्दापूर पोलिसांच्या पथकाने केली आहे.
या प्रकरणी पोलिस नाईक फिरोज शेरखा तडवी (३८) यांच्या तक्रारीवरून आरोपी शेख आरिफ शेख सलीम (३५) व शेख शाकीर शेख गफूर (२८, दोघे रा. वरणगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील फर्दापूर येथील सोयगाव फाट्याजवळ सापळा रचून (एम एच १९ सी. एक्स २१४७) या क्रमांकाच्या पिकअप वाहनाची तपासणी केली.
सदरील वाहनात एकूण सात जनावरे अत्यंत दाटीवाटीने भरली असल्याचे व जनावरांना हालचालीसाठी पुरेशी जागा नसल्याचे तसेच जनावरांसाठी कोणतीही चारापाण्याची व्यवस्था न करता जनावरांना क्रूर पद्धतीने दोऱ्यांनी बांधून त्यांची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांना दिसून आले. दरम्यान, पोलिसांनी पुढील कारवाई करीत प्रत्येकी २० हजार किमतीच्या चार म्हशी, प्रत्येकी १५ हजार किमतीचे दोन रेडे व २ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ३ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.