

Now the water channel shifting work has stopped
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसवा :
शिवाजीनगर भुयारी मार्गातील स्ट्रॉर्म वॉटर ड्रेनच्या कामामध्ये अडथळा ठरणारी महावितरणाची ३३ केव्हीची केबल स्थलांतराचे काम दोन दिवसांपूर्वीच महापालिकेने पूर्ण केले. मात्र अद्यापही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एमजेपी) जलवाहिनी स्थलांतराच्या कामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे मोठा पाऊस झाल्यास पुन्हा भुयारी मार्गात पाणी तुंबण्याची दाट शक्यता आहे.
शिवाजीनगर येथील रेल्वे क्रॉसिंग बंद करून भुयारी मार्ग काढण्यात आला आहे. या कामावेळी पावसाचे पाणी भुयारी मार्गात तुंबणार नाही, यासाठी स्ट्रॉर्म वॉटर ड्रेन उभारले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र घाईघाईमध्ये भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने स्ट्रॉर्म वॉटर ड्रेनचे काम अर्धवट राहिले. त्याचा मोठा फटका वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. या अर्धवट कामामुळे गेल्या महिन्यात अवकाळी पावसाचे पाणी तुंबल्याने भुयारी मार्गातून वाहतूक बंद करण्यात आली होती.
या प्रकारानंतर ओरड होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने स्ट्रॉर्म वॉटर ड्रेनचे काम प्रलंबित ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. मात्र त्यास एमजेपी, महापालिका जबाबदार असल्याची माहिती पुढे आली. अखेर याकामाला अडथळा ठरणारी केबल दोन दिवसांपूर्वीच महापालिकेने स्थलांतर केल्याने आता जलवाहिनी स्थलांतराचे काम राहिले आहे.
या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने एमजेपीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. परंतु अद्याप काम सुरू झाले नसल्याने एमजेपी पुन्हा भुयारी मार्गात पाणी तुंबण्याची प्रतीक्षा करते का, असा सवाल उपस्थित होत आहे.
मार्गातील स्ट्रॉर्म वॉटर ड्रेनचे काम केबल आणि जलवाहिनी स्थलांतर न झाल्याने अर्धवट आहे. त्यामुळे भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचत आहे. हा प्रकार घडू नये, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात नाली तयार करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.