

Republic Day: Sales of tricolor flags worth seven lakhs in the district
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने देशभरात तिरंगा ध्वजची मागणी वाढली असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही झेंडा खरेदीसाठी गर्दी होत आहे. २६ जा-नेवारीचा दिवस उद्यावर आला असताना त्यापूर्वी शनिवार (दि. २४) पर्यंत जिल्ह्यात सुमारे ७ लाखांचे तिरंगा ध्वज विक्री झाले आहेत.
आज रविवारी (दि. २५) ध्वजची विक्री होईल. गतवर्षीप्रमाणे यंदाही ध्वजच्या किमतीत कुठलीच वाढ नसल्याचेही जिल्हा खादी ग्रामोद्य-ोगचे व्यवस्थापक धरमराज राऊत यांनी सांगितले.
देशभरात आझादी का अमृत महोत्सवानिमित्ताने हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर सेल्फी विथ तिरंगा मोहिमेमुळेही सगळीकडेच कापडी तिरंगा ध्वजांची मागणी वाढली आहे. यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्ताने नांदेडवरून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी विविध आकारांतील ८ लाख ९० हजार रुपयांचे ध्वज विक्रीसाठी आले आहेत. यात सिटीचौक सराफा रोड येथील जिल्हा खादी ग्रामोद्योगकडे तब्बल ७ लाख ४० हजार रुपयांचे तर, सिडको येथील खादी ग्रामोद्योगकडे दीड लाखाचे ध्वज आले.
प्रजासत्ताक दिनाच्या आठवड्याभर आधीपासूनच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, नगरपालिकांसह विविध शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालयांकडून ध्वजची मागणी सुरू आहे. त्यामुळे शनिवारपर्यंत सराफा रोड खादीग्रामोद्योगकडे सुमारे ६ लाखाचे तर, सिडको खादीग्रामोद्य-ोगकडे एक लाख रुपयांचे तिरंगा ध्वज नागरिकांनी खरेदी करून नेले आहे. रविवारीही मोठ्या प्रमाणात ध्वज विक्री होईल, असा विश्वास व्यवस्थापकांनी व्यक्त केला आहे.
मध्यम आकारातील ध्वजला डिमांड
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने यंदाही २ बाय ३ आणि ३ बाय ४.५ आकाराच्या तिरंगा ध्वजला चांगली मागणी आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही तिरंगा ध्वजचे दर तेच असल्याचे सिडको खादी ग्रामोद्योगाचे संतोष राऊत यांनी सांगितले.