

A pregnant woman died during treatment
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
प्रसूतिसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संतप्त कुटुंबीय व नातेवाईकांनी शनिवारी (दि. २४) दुपारी उस्मानपुरा पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून ठिय्या आंदोलन केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हर्षीन हिना खालेद चाऊस (२५, रा. शहा कॉलनी, पीरबाजार, उस्मानपुरा) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे नवजात बाळाच्या डोक्यावर आईचे छत्र हिरावले गेले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मयत हर्षीन हिनाला २१ जानेवारी रोजी प्रसूतिसाठी उस्मानपुरा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी सिझर ऑपरे शनद्वारे तिने मुलीला जन्म दिला. मात्र, शस्त्रक्रियेनंतर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला. त्याकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच प्रकृती अधिक खालावल्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता तिला घाईघाईने एका नामांकित रुग्णालयात हलवण्यात आले.
विशेष म्हणजे, रुग्ण हलवताना नातेवाईकांना विश्वासात न घेण्यात आल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. उपचारादरम्यान शुक्रवारी (दि.२३) तिचा मृत्यू झाला. त्यानंतर शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजता संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट उस्मानपुरा पोलिस ठाण्यासमोर आणला.
दोषी डॉक्टरांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक नवनीत ओबेराय, एमआयएमचे नगरसेवक हाजी इसाक खान यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. पोलिस अधिकाऱ्यांनी तक्रार नोंदवून वैद्यकीय समितीच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्याचे अश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.