

लाडसावंगी: पंचायत समिती गणातील सय्यदपुर गावाला जोडणारा नळकांडी पुल दुधना नदीच्या पुरात वाहून गेल्याने गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत, प्रसूती वेदना सुरू झालेल्या गर्भवती महिलेला गुडघाभर पाण्यातून वाट काढत आरोग्य केंद्र गाठावे लागले.
शनिवारी रात्री दुधना नदीला आलेल्या जोरदार पुरामुळे लाडसावंगी-सय्यदपुर मार्गावरील नळकांडी पुल पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे गावाचा मुख्य रस्ता बंद झाला असून, गावातील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता सय्यदपुर येथील कोमल अजय सिरसाठ यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. मात्र, पुल नसल्याने आणि रस्ताही बंद असल्याने घरातील महिलांनी रुग्णाला गुडघाभर पाण्यातून वाट काढत लाडसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.
गावातील सुमारे पन्नास विद्यार्थी दररोज लाडसावंगी येथील शाळेत जातात. मात्र, पुल वाहून गेल्याने आणि पुराचे पाणी अद्याप ओसरणे बाकी असल्याने विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागली आहे. दोन दिवस उलटूनही गावाचा संपर्क अद्याप पूर्ववत झालेला नाही.
नळकांडी पुलाचे काम गेल्या पाच-सहा महिन्यांपासून सुरू आहे. तात्पुरत्या स्वरूपात बांधलेला पुलही पहिल्याच पुरात वाहून गेला. दोन दिवस उलटूनही संबंधित विभागाने दुरुस्तीचे कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. त्यामुळे गावातील नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांना जीवघेण्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.