वैजापूर : बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे आत्याचार आणि रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ वैजापूर शहरामध्ये जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रामगिरी महाराजांवर राज्यात पहिला गुन्हा हा वैजापूर ठण्यात दाखल झाला होता. या घटनेनंतरच महाराजांच्या या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते.
नाशिक जिल्ह्यात झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये महंत रामगिरी महाराजांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ मागील आठवड्यात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरामध्ये सर्वप्रथम याचे पडसाद उमटले होते. तसेच वैजापूरच्या मुख्य चौकामध्ये मोठा जमाव जमल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे आत्याचार आणि रामगिरी महाराजांना समर्थन म्हणून वैजापूर शहरामध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला मोठ्या संख्येने त्यांचे भाविक जमणार असल्याचे बोलले जात असले तरी पोलिसांकडून मात्र जमावबंदी आदेश लागू असल्याने कुठल्याच मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता जनआक्रोश मोर्चा होतो की नाही हे पाहणं महत्वाच असणार आहे.