

Rainfall on last Shravan Monday, normal life disrupted
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी रविवारी रात्री पाऊस झाला. तर शेवटच्या श्रावण सोमवारी दुपारपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. सलग चार दिवस तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने पूर्णा, अंजना, खेळणा या प्रमुख नद्यांसह नदी-नाल्यांना पूर आला. शेवटच्या सोमवारी मुर्डेश्वर, आमसरी, रनेश्वर (हट्टी) येथे भाविकांनी दर्शनासह पर्यटनाचा आनंद घेतला.
तालुक्यात सलग चार दिवसांपासून पाऊस सुरु आहे. शुक्रवार, शनिवारी व रविवारी रात्री तालुक्यात दमदार पाऊस झाला. यात शनिवारी पावसाने तालुका झोडपून काढला. तर अजिंठा, अंभई, आमठाणा, गोळेगाव या चार मंडळात अतिवृष्टी झाली. शनिवारी रात्री ५३ मि. मी. पाऊस झाला. चार दिवसात तालुक्यात सरासरी १०० मि. मी. पावसाची नोंद झाली.
पंधरा दिवसांच्या खंडानंतर पावसाचे जोरदार आगमन झाल्याने बळीराजा सुखावला असून पिके चांगलीच बहरली आहे. सोमवारी सकाळपासूनच पाऊस सुरु झाला. दुपारपर्यंत सुरु असलेल्या पावसाच्या रिपरिपमुळे जनजीवन विस्कळीत झाले. सकाळी शाळकरी मुलांना शाळा गाठताना छत्रीचा आधार घ्यावा लागला. तर सलग चार दिवसांपासून पाऊस सुरु असल्याने पशु पालकांसह दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
शेवटचा श्रावण सोमवार व त्यात पावसाची रिपरिप सुरु असताना शिवालयांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. मुर्डेश्वर येथे सिल्लोड- सोयगाव भाजपच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तर धानोरा वांजोळा फाट्यावरील काशी विश्वेश्वर महादेव संस्थान येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला.
शनिवारी व रविवारी रात्री दमदार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला. या पावसात केळगाव लघु प्रकल्प ६५ टक्के भरला. तर खेळणा प्रकल्पात आवक वाढल्याने पाणीसाठा १० टक्क्यांवर पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वी खेळणा मृतसाठ्यात होता. या प्रकल्पावर सिल्लोड शहरासह पंधरा गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. पूर्णा, अंजना नदीला पूर आल्याने नदी काठावरील गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे.