Railway: Biometric presence mandatory for ticket inspectors
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: डिजिटायझेशनच्या दिशेने आणि तिकीट तपासणी प्रक्रिया रिअल टाईम आणि पारदर्शक बनवण्याच्या दिशेने, दक्षिण मध्य रेल्वेने तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे. यामुळे तपासणीकांचे लोकेशन आणि इन व आऊट टाईमची नोंद होणार आहे.
बायोमेट्रिकची सुविधा झोनमधील सहा ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर (टीटीई) लॉबी म्हणजे सिकंदराबाद, काचिगुडा, विजयवाडा, गुंटकल, गुंटूर आणि नांदेड स्थानकांवर उपलब्ध केली आहे. आता ही सुविधा सर्वच रेल्वेस्थाकांतील तिकीट तपासणीकांसाठी उपलब्ध राहणार आहे. ही प्रणाली झोनमधील सर्व ७३ टीटीई लॉबीमध्ये वाढवली जाणार आहे.
यापूर्वी, तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची साईन-ऑन, साईन ऑफ क्रिया वापरकर्ता नाव आणि पासवर्ड वापरून केली जात होती. आता, तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या लॉगिन यंत्रणेला सुलभकरण्यासाठी, टीटीई लॉबीमध्ये आधार आधारित बायोमेट्रिक साइन-ऑन, साईन ऑफ अॅक्टिव्हिटी सुरू करण्यात आली आहे.
टीटीई लॉबी अॅप्लिकेशनमध्ये फिंगर प्रिंट डिव्हाईस सक्षम करण्यात आले आहे. जे सी-डॅक पोर्टलशी एकत्रित केले आहे. यामुळे तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची त्यांच्या सोर्स स्टेशन आणि डेस्टिनेशन स्टेशनवर प्रत्यक्ष उपस्थिती सुनिश्चित होईल. तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या लॉगिन, लॉगआउट वेळा रिअल टाईम आधारावर रेकॉर्ड होणार आहेत, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वतीने देण्यात आली.