

Raid on Sand Mafia in Godavari; Two Tippers and a Tractor, Including a JCB, Seized
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कानडगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर गंगापूर पोलिसांनी शुक्रवारी (दि.१६) कारवाई करत जेसीबी, दोन टिप्पर आणि ट्रॅक्टरसह तब्बल ४७ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी बाबुलाल शेख (रा. आगर कानडगाव फाटा), विशाल राजेंद्र आरगडे (रा. भेंडाळा), जयराम बाबासाहेब पानकडे (रा. भिवधानोरा) आणि सागर भीमराज लाड (रा. फुलेनगर, गंगापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौजे कानडगाव शिवारातील गायरान परिसरातील गोदावरी नदीपात्रात मध्यरात्रीच्या सुमारास अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास छापा टाकला. यावेळी काही जण विनापरवाना शासनाच्या मालकीची वाळू ट्रॅक्टरला केणी जोडून नदीपात्रातून उपसा करत होते. तसेच जेसीबीच्या सहाय्याने टिप्परमध्ये वाळू भरून महसूल विभागाची परवानगी न घेता चोरटी वाहतूक करून विक्रीसाठी नेण्याच्या तयारीत असल्याचे उघड झाले.
या कारवाईत पोलिसांनी ५ लाख ७५ हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर, १८ लाख रुपये किमतीचा जेसीबी, १२ लाख १२ हजार रुपये किमतीचा टिप्पर तसेच १२ लाख ६ हजार रुपये किमतीचा टिप्पर जप्त केला. दोन्ही टिप्परमध्ये अनुक्रमे अंदाजे दोन ब्रॉस आणि एक ब्रॉस वाळू आढळून आली.
पोलिस अंमलदार भागवत भाऊसाहेब खाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून स. फौ. अवधूत यांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस अधिकारी प्रधान हे करीत आहेत. दरम्यान, गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्री कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.