

Action Taken Against Sand Extraction; Goods worth 13 lakhs including 2 tractors seized
गेवराई, पुढारी वृत्तसेवा : गेवराई तालुक्यात अवैध वाळू उपशावर पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर कारवाई करत तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. म्हाळजपिंपळगाव शिवारात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर गेवराई पोलिसांनी छापा टाकत दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील अवैध वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्यानुसार गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर पवार यांना म्हाळजपिंपळगाव परिसरात वाळू चोरी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची शहानिशा करत त्यांनी तातडीने पथक पाठवून छापा टाकण्याचे आदेश दिले. पोलिसांनी घटनास्थळी धडक देत वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर रंगेहाथ पकडले. या कारवाईत ट्रॅक्टरसह वाळू असा एकूण १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कडके आणि पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक सुरेश पारधी तसेच पोलिस कर्मचारी कल्याण राठोड, नितीन शिंदे, गोरक्ष डोके, धीरज खांडेकर यांनी सहभाग घेतला. दरम्यान, जिल्ह्यातील अवैध वाळू तस्करीविरोधात अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.