

पैठण : पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचे साखर कारखान्यांकडे थकीत असलेले ऊसाचे पैसे तात्काळ मिळावेत, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी नाथसागर धरणाच्या जलपूजन कार्यक्रमात आंदोलन केले. पाटबंधारे विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मंत्री विखे पाटील नागरिकांना मार्गदर्शन करत असताना, अचानक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी "ऊसाचे पेमेंट मिळत कसं नाही?" अशा घोषणा देत कार्यक्रमात गोंधळ निर्माण केला. या घोषणाबाजीमुळे काही काळ कार्यक्रमात अडथळा निर्माण झाला.
घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, आमदार विलास बापू भुमरे, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना आणि तहसीलदार ज्योती पवार यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून घोषणाबाजी थांबवण्याची विनंती केली.
आमदार विलास बापू भुमरे यांनी ऊस शेतकऱ्यांचे थकीत पैसे तात्काळ देण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी केली. त्यानंतर शेतकरी संघटनेचे प्रमुख ज्ञानदेव मुळे, चंद्रकांत झारगड आणि इतर पदाधिकारी शांत झाले आणि त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या आंदोलनामुळे ऊस शेतकऱ्यांच्या थकीत पेमेंटच्या प्रश्नाला पुन्हा एकदा वाचा फुटली असून, शेतकरी संघटना आता अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.