

Rabi sowing exceeds average
कन्नड, पुढारी वृत्तसेवा तालुक्यात रब्बी हंगामातील पेरणी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू झाली. डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात रब्बीच्या पेरणीने सरासरी ओलांडली आहे.
रब्बीसाठी तालुक्यात ४६ हजार ५१० हेक्टर क्षेत्र अपेक्षित होते. मात्र आजरोजी प्रत्यक्षात २३ हजार २५५ हेक्टरवर म्हणजेच ५१.५६ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. गहू, ज्वारी, हरभरा, मका, कांदा, ऊस आदी पिकांचा पेरा वाढला असून. डिसेंबर अखेर या पेऱ्यात मोठी वाढ होण्याची शक्यता असून निश्चित सरासरी ओलांडली जाणार असल्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. खरीप हंगामातील कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कपाशी उपटून त्या क्षेत्रावर उन्हाळी कांदा, मका, बाजरी ऊस आदी पिके घेण्याची तयारी आहे.
तालुक्यातील सर्वच मंडळांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाची सरा-सरी जरी ओलांडली असली तरी त्याचा मोठा फटका पिशोर, करंजखेड, चिंचोली, चिखलठाण, नाचनवेल, नागद, देवगाव, चापानेर या मंडळांतील गावांमधील खरीप पिकांना बसला होता. वेचणीला आलेला कापूस, सोंगणीला आलेली मका, सोयाबीन, अद्रक आदी पिकांची मोठी नासाडी झाली होती. या नुकसानीची दखल घेत महसूल विभागाने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.
नदी-नाले ओव्हरफ्लो झाल्याने रब्बीचा पेरा वाढला तालुक्यातील पूर्णा, अंजना, शिवना, गांधारी आदी प्रमुख नद्या व नाल्यांना महापूर आला होता. यामुळे शिवना टाकळी मध्यम प्रकल्प, अंजना पळशी, पूर्णा नेवपूर आदी मध्यम प्रकल्प, धरणे, सिमेंट बंधारे व पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओव्-हरफ्लो झाले.
खरीप हंगामातील उत्पादनात घट आल्याने शेतकऱ्यांनी मरगळ झटकून रब्बी हंगामासाठी कंबर कसली. सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने पेरणी करण्यात आली. अपेक्षित सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
पांढरे सोने हद्दपार
तालुक्यातील कोरडवाहू व बागायती शेतकऱ्यांचे नगदी पैशाचे पीक म्हणून कापूस पिकाकडे बघितले जायच. गेल्या तीन चार वर्षांपासून भावात न झालेली वाढ, वे-चणीचा खर्च, व कमी झालेले उत्पन्न यामुळे शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजल्या जाणारा कापूस हे पीक पुढील वर्षी हद्दपार झालेले दिसणार आहे.