

Congress' sit-in protest at Tehsil office
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा:
शेतकरी प्रश्नांवर निवेदन देण्यासाठी गेलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची तहसीलदारांसोबत भेट न झाल्याने पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयातच ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली. काही वेळाने तहसीलदार कार्यालयात आले. तेव्हा त्यांनी भेट का दिली नाही यावरून काँग्रेस पदाधिकारी आणि तहसीलदारांमध्ये वादावादी झाली.
तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकारी बुधवारी तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. येण्यापूर्वी तहसील कार्यालयाला कळवलेही होते. परंतु पदाधिकारी पोहोचले तेव्हा बिडवे हे व्हिजिटला गेले असल्याचे सांगण्यात आले, पदाधिकाऱ्यांनी फोनवरून विचारला केली असता १५ मिनिटात येतो असे बिडवे म्हणाले. मात्र दीड तास झाला तरीही ते आले नाही.
त्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयातच ठिय्या मांडत भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली. काही वेळाने तहसीलदार बिडवे हे कार्यालयात आले आणि त्यांनी निवेदन स्वीकारले. तहसीलदार हे भाजपच्या सांगण्यावरून बाहेर गेले होते असा आरोप यावेळी जगन्नाथ काळे यांनी केला. यावेळी जगन्नाथ काळे, मनोज शेजूळ, राहुल सावंत, सद्दाम पठाण, देवकर, विश्वास औताडे, विठ्ठल कोरडे, विनोद देहाडे, गौतम घोरपडे, दत्तू ठोंबरे, किरण पाखरे, शफिक पठाण, नंदू बाळा चव्हाण आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
कापसाला १० हजार रुपये भाव द्या
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या. यात शासनाने घोषित केलेल्या हमी भावाने कापूस, मका, सोयाबीन खरेदी केले जात नाही. व्यापारी कवडीमोल भावाने शेतकऱ्यांचा माल खरेदी करत आहे. शासनाने तात्काळ खरेदी केंद्रे सुरू करावीत, कापसाला दहा हजार रुपये क्विटल आणि सोयाबीनला सात हजार रुपये क्विटल तसेच मकाला चार हजार रुपये क्विटलचा भाव द्यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.