

Shiv Bhojan Thali subsidy of Rs 12 crores is overdue
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्र चालकांना गेल्या आठ महिन्यांपासून अनुदान मिळालेले आहे. या केंद्र चालकांचे सुमारे बारा कोटी रुपयांचे अनुान शासनाने थकविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १०२ केंद्र चालक अडचणीत आले आहेत.
राज्य सरकारने २०२० साली शिवभोजन थाळी योजना सुरू केली. राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना दहा रुपयांत पोष्टिक जेवण दिले जाते. यात दोन चपाती, भाजी, डाळ आणि भात यांचा समावेश असतो. या केंद्र चालकांना शासनाकडून थाळीनुसार अनुदान दिले जाते.
शिवभोजन ही युती सरकारच्या काळातील झुणका भाकर योजनेच्या संकल्पनेवर आधारित योजना आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०२ शिवभोजन थाळी केंद्र आहेत. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून या केंद्र चालकांना शासनाकडून अनुदान मिळालेले नाही.
सद्यस्थितीत या केंद्र चालकांचे सुमारे बारा कोटी रुपये थकले आहेत. अनुदान मिळावे यासाठी केंद्र चालक जिल्हा पुरवठा विभागात चकरा मारत आहेत. तर पुरवठा विभागाकडूनही वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले.
केंद्र बंद होण्याच्या मार्गावर
महाराष्ट्र शिवभोजन चालक कृती समितीने थकित अनुदान त्वरित अदा करण्याची मागणी केली आहे. शिवभोजन थाळी केंद्र चालकांना अनुदान न मिळाल्यामुळे केंद्राच्या नियमित कार्यावर परिणाम होत आहे. केंद्रचालकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. योजनेचा उद्देश गरजू नागरिकांना स्वस्त, पौष्टिक आणि सन्मानाने भोजन उपलब्ध करून देणे आहे. मात्र थकित अनुदानामुळे अनेक केंद्रे बंद होण्याच्या स्थितीत आहेत, असेही कृती समितीने म्हटले आहे.