

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: लोकसभेत महिला विधेयकाला विरोध करणारे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात आज (दि.२४) भाजप महिला आघाडीने क्रांती चौकात आंदोलन केले. खा. जलील यांच्याविरोधात जोरदार घोषणा देत त्यांच्या पोस्टरला जोडे मारुन काळे फासून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, महिला आघाडीच्या प्रदेश सचिव शालिनी बुंदे, प्रदेश सरचिटणीस मीना मिसाळ, महिला शहर जिल्हाध्यक्षा अमृता पालोदकर, शहर संघटन सरचिटणीस राजेश मेहता, कचरू घोडके, लता दलाल आदींची प्रमुख उपस्थिती होती. दोन दिवसांपूर्वीच केंद्रातील भाजप सरकारने लोकसभेच्या विशेष अधिवेशनात नारी शक्ती वंदन विधेयक सादर केले होते. या विधेयकाला केवळ दोन खासदारांनीच विरोध केला. त्यात जिल्ह्याचे एमआयएम प्रदेशाध्यक्ष खासदार जलील यांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने शहराध्यक्ष बोराळकर यांच्या नेतृत्त्वात क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली.
देशभरातून या विधेयकाचे स्वागत होत आहे. अन् खा. जलील हे या विधेयकाला विरोध करीत आहे. महिलांबद्दल त्यांची द्वेषाची भावना असून त्याविरोधात भाजपच्या नारीशक्तीने त्यांच्या पोस्टरला काळे फसले आणि जोडे मारून निषेध व्यक्त केला. महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणा देत क्रांती चौक परिसर दणाणून सोडला.
हेही वाचा