

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ऊन, पावसाचा खेळ आणि सणासुदीनिमित्त झालेल्या गर्दीमुळे साथीच्या आजारांचा फैलाव वाढला आहे. लहान मुलांनाही व्हायरल इन्फेक्शनने बेजार केले आहे. एकट्या घाटीत साथीच्या आजाराची तब्बल ८० बालके उपचारासाठी दाखल आहेत. तर खासगी रुग्णालयांमध्येही सर्दी, खोकला, थंडी-तापेसह श्वसन विकारांच्या रुग्णांची गर्दी वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
शहरात वातावरण बदलामुळे व्हायरलची साथ जोरात सुरू आहे. घराघरांत सर्दी, खोकला, तापेचे रुग्ण आढळून येत आहेत. आठवड्याभरापासून दिवसभर ऊन आणि पावसाचा खेळ सुरू आहे. कडक ऊन पडलेले असताना अचानक ढगाळ वातावरण होऊन पाऊस बसरत आहे. या वातावरण बदलाचा परिणाम अनेकांच्या आरोग्यावर होत आहे.
त्यातच डासांचे प्रमाण वाढल्यामुळे डेंग्यूचाही सर्वत्र झपाट्याने फैलाव होत चालला आहे. विषाणूजन्य, श्वसनाचे विकार आणि सर्दी-खोकला, थंडी, अशक्तपणा या सारख्या आजाराच्या तापेने भल्या-भल्यांना बेजार केले आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक व्हायरलने त्रस्त झाले आहेत. खासगी बालरोगतज्ज्ञांच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या बालकांची गर्दी दिसून येत आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या (घाटी) बालरोग विभागात १ ते १२ वर्षांपर्यंतची १३६ बालके उपचारासाठी दाखल आहेत. यातील तब्बल ६० टक्के म्हणजे ८० हून अधिक मुले श्वसन विकार, निमोनिया, व्हायरल इन्फेक्शनची आहेत.
एक वर्षापर्यंतच्या बालकांची विशेष काळजी घ्यावी. आईचे दूध पाजावे. लसीकरण करून घ्यावे. संसर्ग असलेल्या व्यक्तींपासून दूर ठेवावे. लहान मुलांना पोषक आहार द्यावे. भरपूर पाणी प्यावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. हाताची स्वच्छता ठेवावी. रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ देऊ नये.